पुणे, ता. ११ : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकवण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. बसस्थानकातील गर्दीच्या ठिकाणी आणि निर्जन ठिकाणी चोरटे आपला हात साफ करत आहेत.
महिलांनी काय काळजी घ्यावी
- बाजार, रेल्वे स्थानक, बसथांबे, गर्दीच्या ठिकाणी मौल्यवान दागिने घालणे टाळावे.
- खऱ्याऐवजी बनावट/इमिटेशन दागिने वापरावेत.
- एखादी व्यक्ती संशयास्पद वाटल्यास तत्काळ दूर जावे आणि मदतीसाठी इतरांकडे वळावे.
- अंधाऱ्या किंवा निर्जन रस्त्यांवर शक्यतो एकट्याने प्रवास टाळावा.
- गर्दीच्या ठिकाणी सीसीटीव्ही असलेल्या भागातून जावे.
- शक्य असल्यास स्वतःसोबत सुरक्षा उपकरण ठेवावे
पोलिस व प्रशासनाने काय करावे
- महिला अधिक जास्त ये-जा करतात अशा ठिकाणी पोलिस गस्त सतत असावी.
- बाजारपेठ, मंदिरे, रेल्वे स्थानके, बसथांबे आदी ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असावेत.
- पोलिसांनी साध्या गणवेशात गस्त घालावी.
- चोरींच्या घटनांची त्वरित तपास करून गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी.
- महिलांना सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करावे.
- महिलांना त्वरित मदत मिळेल अशा हेल्पलाइन क्रमांकांची माहिती प्रत्येक महिलेला मिळावी.
- स्थानिक पातळीवर महिला सुरक्षा समित्या स्थापन करणे
- महिलांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण द्यावे
- विविध भागात नागरिकांची देखरेख यंत्रणा तयार करावी.
महिलांच्या जिवाला धोका
गळ्यातील सोनसाखळी हिसकावताना महिलांना दुखापत झाल्याच्या घटना आहे. बारामतीत सोनसाखळी चोरीच्या प्रयत्नात ४ जुलै रोजी जयश्री रतीलाल गायकवाड या दुचाकीवरून पडल्याने जबर जखमी झाल्या. त्याच्या डोळ्याजवळ दुखापत आहे. मनगटाचा भुगा झाला असून, त्यावर शस्त्रक्रिया केली आहे. हात फ्रॅक्चर असून, पायाला चार टाके पडलेले आहेत. नशिबाने त्यांच्या डोक्याला दुखापत झाली नाही, अन्यथा काहीही चूक नसताना त्यांच्या जिवावर सोनसाखळी चोरी बेतली असती. तसेच, शिरूर शहर व परिसरात घडलेल्या सोनसाखळी खेचून नेण्याच्या घटनांत चोरीला गेलेल्या ऐवजांच्या किंमतीपेक्षा संबंधित महिलांचे जीव धोक्यात आले होते, हे प्रकर्षाने दिसून आले.
सोन्याच्या दरात
नोंदीपेक्षा तफावत
सोन्याच्या दागिन्यांच्या बाबतीत दागिने चोरीला गेल्यानंतर पोलिस दप्तरी जी नोंद केली जाते व बाजारभाव यात कमालीची तफावत असते. वास्तविक ज्या दिवशी दागिने चोरीला जातात, त्या दिवसाचा बाजारभाव निश्चित करून त्या दिवशी ते दागिने विकले असते तर त्याचे मूल्यांकन किती झाले असते, ही बाब विचारात घेऊन त्यानुसार फिर्यादीत किंमत लिहायला हवी. प्रत्यक्षात पोलिसच त्याचा दर निश्चित करून किंमत ठरवितात. यात बदल व्हायला हवा व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालावे, अशीही तक्रारदारांची मागणी आहे.
स्थानिक पोलिसांची
कामगिरी सुमार
स्थानिक पोलिस ठाण्याच्या अखत्यारीतील गुन्हे शोध पथकांची कामगिरी सुमार आहे. पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कामगिरी तुलनेने सरस असली तरी त्यांच्यावरही जिल्ह्याची जबाबदारी आहे.
अशी करतात
बसमध्ये चोरी
गर्दीत एसटी बसमध्ये प्रवेश करताना अन्य चोरट्या महिला प्रवासी महिलेच्या सभोवती उभ्या राहून मंगळसूत्र चोरून नेतात. अशी त्यांची चोरीची पद्धत असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.