सोमनाथ भिले : सकाळ वृत्तसेवा
डोर्लेवाडी : सोनगाव (ता. बारामती) येथील कऱ्हा व नीरा नदीच्या संगमावर वसलेले श्री क्षेत्र सोनेश्वर मंदिर देवस्थान हे धार्मिक स्थळाबरोबर पर्यटनस्थळही आहे. तीर्थक्षेत्र परिसर अध्यात्म साधनेचे केंद्र बनले आहे. पक्षी निरीक्षणासाठीही रमणीय ठिकाण असल्याने श्रावण महिन्यात राज्यभरातून हजारो भाविक दर्शनासाठी येथे येतात.
मार्कंडेय ऋषींना श्री शिवकृपेने कल्प आयुष्य प्राप्त झाल्यावर त्यांनी शिव आराधना करत काल व्यतीत करण्याचे ठरवून बलाढ्य शक्तीच्या साह्याने ११ शिवमंदिरे स्थापन केली. मार्कंडेय ऋषीमुळे ही स्थाने शिवकृपेने जागृत समजली जातात. जेजुरी, नारायणपूर, मोरगावसह बारामती कसबा येथील श्री काशिविश्वेश्वर, मेडद येथील भीमाशंकर, श्री सोनेश्वर हे अकरावे मंदिर आहे. सोनगाव येथील या मंदिरातील शिवलिंग व कळस सोन्याचे होते, म्हणून त्या मंदिराला सोनेश्वर म्हटले जाते.
पुराच्या पाण्याने मंदिराला संपूर्ण वेढा येतो. त्यामुळे तिन्ही बाजूंनी पाण्याने वेढलेल्या या मंदिराचे सौंदर्य पावसाळ्यात अधिकच खुलते. गावातून आल्यानंतर मंदिराला जाताना नावेतून जावे लागते. दक्षिणेकडे एका बाजूने थेट मंदिरापर्यंत जाण्यासाठी रस्त्याची सोय आहे. परंतु नावेतून जाण्याची मजा काही औरच असते. परिसरात हिरवाई असल्याने पर्यटक या ठिकाणी आवर्जून थांबतात.
भाविकांसाठीच्या सोयीसुविधा
१. महाशिवरात्र तसेच श्रावण महिन्यात दर सोमवारी महाप्रसाद
२. वर्षभर गाभाऱ्याच्या आत पिंडीला अभिषेक करण्याची सोय
३. भाविकांसाठी भक्तनिवासात राहण्याची सोय
४. प्रत्येक श्रावणी सोमवारी दिवसभर भजन-कीर्तन
भाविकांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. दर्शन रांगेत सुसूत्रता यावी व चोऱ्या होऊ नयेत म्हणून दर्शनबारी मंदिराच्या बाहेर आणली आहे. बारामती ग्रामीण पोलिस ठाणे यांच्यातर्फे दर सोमवारी चोख बंदोबस्त ठेवला जाणार आहे. होडीतून सुरक्षित प्रवास व्हावा यासाठी कमी संख्येने भाविक पाठविण्यात येणार आहेत.
-वैशाली पाटील पोलिस निरीक्षक
होडीत सुरक्षा साधनांची व्यवस्था
देवस्थान समितीचे अध्यक्ष संदेश गिते व सचिव दत्तात्रेय मळेकर म्हणाले की, शेवटच्या सोमवारी जास्त गर्दी असते. नदीपात्रातील होडीतून येणाऱ्या भाविकांची गर्दी व धोका टाळण्यासाठी स्वयंसेवकांची मदत घेतली जाणार आहे. शिवाय होडीत सुरक्षा साधने ठेवली जाणार आहेत. मंदिरापासून काही अंतरावर वाहनाची सोय केली आहे. गर्दी टाळण्यासाठी पेढे, स्टेशनरी, हॉटेल, पाळणे या दुकानांच्या रांगा एकमेकांपासून दूर आणि स्वतंत्र असणार आहेत.
अशी घ्या काळजी
* पाऊस असेल तर नावेतून येणे टाळावे.
* निंबाळकर वस्तीकडील बाजूच्या रस्त्याने मंदिरात यावे
* रात्रीचे येणे टाळावे. संध्याकाळी सहानंतर नावेची सेवा बंद
कसे जाल?
स्वारगेट-जेजुरी-मोरगाव बारामती डोर्लेवाडी सोनगाव - सोनेश्वर मंदिर हे अंतर साधारण ११० किमी आहे.
मदतीसाठी संपर्क
बारामती ग्रामीण पोलिस दूरक्षेत्र : (०२११२) २४३४३३
डोर्लेवाडी आरोग्य केंद्र रुग्णवाहिका : ९८६०२६१०९०
34605, 34607,
सोनगाव (ता. बारामती) : कऱ्हा व नीरा नदीच्या संगमावर वसलेले सोनेश्वर मंदिर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.