धोंडिबा कुंभार ः सकाळ वृत्तसेवा
पिरंगुट, ता. २० : मुठा खोऱ्यातील लवासा रस्ता सध्या निकृष्ट दर्जाच्या कामाच्या आरोपामुळे चौकशीच्या फेऱ्यात अडकला आहे. त्यामुळे येथील मुठा ते लवार्डे या रस्त्यावर जिकडे तिकडे खड्डेच खड्डे, अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे या रस्त्याला मंजूर झालेले साडेतीन कोटी रुपये गेले कुठे? असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहे.
मुठा ते लवार्डे दरम्यानचा हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येतो. या रस्त्याच्या कामाला संबंधित कंत्राटदाराने प्रत्यक्ष सन २०२२ मध्ये सुरुवात केली. मात्र, काही स्थानिकांनी हे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप करीत बंद पाडले आणि त्याची खातेनिहाय चौकशी करण्याची मागणी केली. त्यामुळे या रस्त्याच्या कामाची चौकशी अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे दुरुस्तीचे कामही रखडले असून, चौकशीही पूर्ण झालेली नाही. त्याचा फटका बसल्याने येथील रस्त्याची आणखीनच दुरवस्था झाली आहे.
मुठा ते लवार्डे रस्ता
अंतर- ९ किलोमीटर
खड्डे संख्या- ७०० ते ७५०
गेल्या चार वर्षातील निधी - ३ कोटी ५१ लाख
गेल्या चार वर्षांपासून या रस्त्यावर केवळ मुरूम टाकून खड्डे बुजविले जात आहेत. त्यामुळे दुरवस्था वाढत चालली आहे.
- लक्ष्मण मारणे, सरपंच, खारावडे ग्रामपंचायत
या रस्त्यासाठी साडे तीन कोटी रुपयांचा निधी मिळूनही वेळेत काम न झाल्याने झालेले कामही पाण्यातच गेले आहे. साडेतीन कोटी रुपये गेले कुठे, अशी शंका निर्माण झाली आहे. उर्वरित काम तातडीने पूर्ण होणे गरजेचे आहे.
-महादेव कोंढरे, माजी सभापती
या रस्त्यावर काही ठिकाणी १०० तर काही ठिकाणी ५० मीटर अंतरावर एमपीएम, तसेच बीएमचे काम झालेले आहे. त्यासाठी दीड कोटी रुपये मिळालेले होते. मात्र, त्यानंतर चौकशी लागल्याने काम बंद ठेवण्यात आले. त्यामुळे वरचा थर करता आलेला नाही. त्यामुळे हा रस्ता पावसाच्या पाण्याने वारंवार उखडून तयार झालेल्या खड्ड्यात पुन्हा पाणी साचू लागले आहे. तरीही दिवाळीनंतर उर्वरित काम सुरू होईल.
-हेमंत पाटील, अभियंता
04797