पिरंगुट, ता. १ : मुठा खोरे वारकरी संप्रदाय समितीच्या आळंदी येथील धर्मशाळेचा उद्घाटन समारंभ आणि श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा शनिवार (ता. ४) व रविवार (ता.५) आयोजित केला आहे. शनिवार (ता. ४) गुरुवर्य शांतीब्रह्म मारुती महाराज कुऱ्हेकर आणि आचार्य मंदारस्वामी येनपुरे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील मूर्ती प्राणप्रतिष्ठापना आणि कलशारोहण होणार आहे. रविवारी (ता. ५) सकाळी ११ वाजता उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकात पाटील व शांतीब्रह्म मारुती महाराज कुऱ्हेकर यांच्या हस्ते धर्मशाळेचे उद्घाटन होणार आहे. दरम्यान, दुपारी ३ ते ४ पं. शौनक अभिषेकी आणि पं.अमोल निसळ यांचे शिष्य करण देवगावकर यांचा भक्तीगीताचा कार्यक्रम होणार आहे. रामचंद्र भरेकर यांनी सांगितले की, समितीचे एकूण एक हजार पेक्षा अधिक सभासद आहेत. मुठा खोरे वारकरी संप्रदाय समितीच्या माध्यमातून आळंदी येथे १२ गुंठे क्षेत्रात ५००० चौरस फूट इतक्या क्षेत्रात धर्मशाळा उभारली आहे. सुमारे तीन कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कमेतून ही तीन मजली इमारत मुळशीतील वारकरी संप्रदायांसाठी तसेच वारकऱ्यांसाठी सोयीची होणार आहे. वारीच्या वेळी निवासाची तसेच अन्य धार्मिक कार्यासाठी या धर्मशाळेचा मोठा लाभ होणार आहे. संगणक कक्ष, ग्रंथालय तसेच विविध प्रकारचे शैक्षणिक कोर्सेस आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.