पुणे

अकरावी प्रवेशापासून विद्यार्थी वंचित

CD

पौड, ता. १७ : इयत्ता अकरावीच्या ऑनलाइन प्रणालीअंतर्गत केंद्रीय प्रवेशप्रक्रियेचे सर्व टप्पे संपले तरीदेखील मुळशी तालुक्यात अजूनही काही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले आहेत. तर काही शाळांमध्ये कला, वाणिज्य शाखेच्या जागा रिक्त राहिल्या आहेत. दहावीत चांगले गुण मिळूनही आकारावीत प्रवेश न मिळाल्याने गुणवान विद्यार्थी आणि पालक नैराश्याच्या गर्तेत सापडली आहेत.
यावर्षी राज्य सरकारने प्रथमच ग्रामीण भागात ऑनलाइन केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविली. वास्तविक ग्रामीण भागात आजही घरापासून दूर अंतरावर अकरावी, बारावीचे वर्ग असलेल्या शाळा आहेत. त्यामुळे यापूर्वी ग्रामीण भागात विद्यार्थी वाहतुकीच्या दृष्टीने सोयीच्या असलेल्या शाळेत ऑफलाइन पद्धतीने प्रवेश घेत होते. तर सोईस्कर शाळा मिळत असल्याने पालक मुलींनाही उच्च शिक्षणासाठी पाठवीत होते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सोयीसाठी शाळाही शिक्षण विभागाची परवानगीने प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश देत होते.
मुळशी तालुक्यात पिरंगुट, पौड, भूगाव, भांबर्डे, हिंजवडी या भागांत अनुदानित, विनाअनुदानित शाळांमध्ये अकरावी, बारावीचे वर्ग आहेत. त्यामुळे सर्वसाधारणपणे मुळशी धरण, माले आणि कोळवण खोऱ्यातील विद्यार्थी पौडला शिकत होते. भूगाव, भुकूम आणि मुठा खोऱ्यातील विद्यार्थी पिरंगुट, भूगाव या शाळांमध्ये प्राधान्याने प्रवेश घेत होते. याशिवाय मारुंजी, माण, नेरे, कासारसाई या भागातील विद्यार्थी हिंजवडी येथे शिकत होते. तसेच ज्यांची पुण्यात राहण्याची सोय आहे असे विद्यार्थी शहरात शिकायला जातात. तर काही विद्यार्थी गावाहून पुण्याला दररोज ये-जा करीत उच्च शिक्षण घेतात. यावर्षी प्रथमच ऑनलाइन केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविली गेली. त्यामुळे सुरुवातीपासून विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचीही भंबेरी उडाली होती. परिणामी तांत्रिक अडथळ्यामुळे, अज्ञानामुळे या प्रक्रियेचा ऑनलाइन अर्जही काही विद्यार्थ्यांनी भरता आला नाही, तर काहींकडून मोबाइलमधून अर्ज भरताना अनवधानाने, गैरसमजुतीने चुकीच्या नोंदी झाल्या. सायबर कॅफेत जाऊन भरलेल्या अर्जामध्येही काही त्रुटी राहिल्या. प्रत्येक फेरीच्यावेळी ऑनलाइन अर्ज अपडेट करायचा असतो, हे देखील काही विद्यार्थी पालकांना समजले नाही.

याबाबत समजलेच नाही
अर्ज भरताना इन हाऊस, मॅनेजमेंट आणि अल्पसंख्याक कोटा याबाबत विद्यार्थी, पालक यांना काही समजले नाही. ज्या शाळेत दहावी झाली, त्याच शाळेत काहींनी अकरावीसाठी प्रवेश मिळावा म्हणून एकच शाळा निवडली. पण शेवटच्या फेरीपर्यंत निवडलेल्या शाळेत प्रवेश मिळाला नाही. काही विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक प्रत्येक फेरीला अर्ज अपडेट केला. परंतु शेवटच्या फेरीपर्यंत त्यांचे नावच यादीत आले नाही. त्यामुळे दहावीत अव्वल गुण मिळूनही ऑनलाइन अर्ज भरून काही विद्यार्थी अद्याप प्रवेशापासून वंचित आहेत.

विद्यार्थ्यांसह पालकांची चलबिचल
अकरावीचे वर्गही सुरू झाल्याने प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थी, पालकांची चलबिचल होऊ लागली आहे. याबाबत काही पालकांनी मुळशी पंचायत समितीचे माजी सभापती रवींद्र कंधारे यांच्याकडे आपली कैफियत मांडली. त्यावेळी कंधारे यांनीही शिक्षण उपसंचालक डॉ.गणपत मोरे यांची भेट घेतली. ग्रामीण भागात जे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत. त्यांना त्यांच्या सोयीच्या शाळेत ऑफलाइन प्रवेश मिळण्याबाबत शिक्षण विभागाने सकारात्मक पाऊल उचलावे, अशी मागणी निवेदनाद्वारे केली.

मला दहावीला ७९ टक्के गुण आहेत. मी सुरुवातीलाच वाणिज्य शाखेसाठी अर्ज भरला होता. परंतु दरवेळी अर्ज अपडेट करायचा असतो, हे मला समजलेच नाही. त्यामुळे मला अजून कोणत्याच शाळेत प्रवेश मिळाला नाही. अकरावीची शाळाही सुरू झाली आहे. मी काय करू मला समजेना.
- एक विद्यार्थी, कोळवण

माझ्या मुलीचा ऑनलाइन अर्ज मी प्रत्येकवेळी अपडेट केला. भाग दोन पूर्ण करून लॉक केला. परंतु तिला ७१ टक्के गुण असूनही शेवटच्या फेरीपर्यंत प्रवेश मिळाला नाही. ऑनलाइनची सर्व प्रक्रिया पूर्ण करूनही प्रवेश मिळाला नाही, त्यामुळे पुढे काय करावे हेच कळेना. माझ्या मुलीचे करिअर वाया जाऊ नये हीच विनंती.
एक पालक, करमोळी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW: टीम इंडियाच्या नारी शक्तीचा ऐतिहासिक विजय! ऑस्ट्रेलियाचा वन डे क्रिकेट इतिहासात असा पराभव कुणी केलाच नव्हता...

Archana Kute: 'ज्ञानराधा मल्टिस्टेट'च्या अर्चना कुटेंना पुण्यातून अटक; छाप्यात काय-काय सापडलं?

Nude Party: न्यूड पार्टीचे फोटो सोशल मीडियात व्हायरल; संशयित आयोजकांना अटक

PAK vs UAE Live: बिचारे... PCB ने खेळाडूंना तोंडावर पाडले, बॅगा घेऊन स्टेडियमवर पोहोचले; मॅच रेफरी Andy Pycroft च राहिले, टॉसही हरले

Latest Marathi News Updates: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT