राजेगाव, ता. २६ : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील एका चहाच्या टपरीवर मित्रांसोबत चहा पीत असताना, अवैधरीत्या गॅस चोरी होत असल्याने दिसल्याने छायाचित्र काढले. म्हणून गॅस माफियांनी एका पत्रकारासह त्याच्या दोन मित्रांना जीवे मारण्याची धमकी देऊन लोखंडी पाइप व लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना घडली आहे. एवढेच नाही तर अवैध धंदेचालकांनी त्यांच्या अंगावर लघुशंका केल्याचे घृणास्पद कृत्य केले आहे. याप्रकरणी १० ते १२ जणांवर दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या मारहाणीत एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना खडकी (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीतील दयानंद हॉटेल परिसरात बुधवारी (ता.२४) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. महावीर भानुदास वजाळे (वय ३६, रा. आकुंभे ता. माढा जि. सोलापूर) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. त्यांच्यावर मदनवाडी (ता. इंदापूर) येथील भिगवण खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. याप्रकरणी दौंड पोलिस ठाण्यात शेट्टी व शिंदे (दोघांचेही पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) व इतर ८ ते १० अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महावीर वजाळे हे पत्रकार म्हणून काम करीत आहेत. वजाळे यांचे मित्र अनिल आरडे व श्रीकांत मासुळे हे कुरंकुभ (ता. दौंड) येथील मित्राला भेटण्यासाठी गेले होते. त्यांचे काम आटोपल्यानंतर ते माघारी घरी निघाले होते. तेव्हा ते पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील खडकी (ता. दौड) गावच्या हद्दीत दयानंद हॉटेलजवळ असलेल्या एका चहाच्या टपरीवर चहा पिण्यासाठी थांबले होते. तेव्हा तेथे दोन गॅसच्या टॅंकरमधून अवैधरीत्या गॅस चोरी सुरू असल्याचे श्रीकांत मासुळेने मोबाइलमध्ये छायाचित्र काढले. तर महावीर वजाळे यांच्या हातात पत्रकारितेचा बूम दिसल्याने तेथे उपस्थित आठ ते दहा जणांनी वजाळे, अनिल आरडे व श्रीकांत मासुळे यांना लोखंडी पाइप व लाकडी दांड्याने मारहाण केली. आरोपी शिंदेने अनिल आरडे यांना तुला कोणी पाठविले ते सांगा नाहीतर तुला जीव मारतो, अशी धमकी दिली. तसेच त्याला बाहेर घेऊन जा, चांगला सरळ करा. आणि श्रीकांत मासुळे याने जर छायाचित्र काढले असतील तर त्याच्या अंगावर वाहन घाला व जीव मारा, असे शिंदे यांनी त्याच्या सहकाऱ्यांना सांगितले. तर महावीर वजाळे यांच्या डोक्यात पाणी ओतले व त्यांच्या अंगावर लघूशंका केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या मारहाणीत महावीर वजाळे यांच्या दोन बरगड्या व डाव्या हाताचा अंगठा फॅक्चर झाला आहे. तर अनिल आरडे व श्रीकांत मासुळे या दोघांना देखील मुकामार लागला आहे. पुढील तपास दौंडचे उप विभागीय पोलिस अधिकारी बापुपूराव दडस करत आहेत.