रांजणगाव सांडस, ता. २९ ः उरळगाव (ता. शिरूर) येथे अनधिकृतपणे बेकायदेशीर गावठी हातभट्टीतून दारू निर्मिती करून दारू विक्री केली जात आहे. त्या दारूभट्टी व विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी ठोस कारवाई करून संपूर्णपणे दारू बंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती.
याबाबत सरपंच स्वप्नील गिरमकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मासिक सभेत ग्रामपंचायत सदस्य स्वाती शशिकांत कोकडे यांनी सूचना मांडली. या सूचनेत उपसरपंच लंकाताई सचिन पाचुंदकर यांनी सर्वानुमते अनुमोदन दिले. त्यामुळे ग्रामपंचायतीने सर्वानुमते हा ठराव मंजूर केला. यानंतर पुढे उरळगाव येथील पांडुरंग मंदिरात सरपंच गिरमकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेतही शशिकांत कोकडे यांनी सूचना मांडली. याला गजानन जांभळकर, सागर गिरमकर, उमेश पंदरकर, सागर पोपळघट, अनुराग कोकडे आदींनी सर्वांमध्ये अनुमोदन दिले. त्यामुळे हा ठराव सर्वानुमते मंजूर झाला.
याच्या प्रति शिरूर येथील पोलिस निरीक्षक, पुणे येथील ग्रामीण पोलिस अधीक्षक व अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांना शशिकांत कोकडे यांनी दिल्या. त्यामध्ये त्यांनी उरळगाव येथे गावठी दारूभट्ट्या आणि गावठी दारू विक्री होत असल्याने गावातील सामाजिक वातावरण बिघडत आहे. त्यामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. तसेच, महिला व विद्यार्थ्यांना याचा प्रचंड मानसिक त्रास होत असल्याचे अर्जात नमूद केले होते. याची दखल घेऊन पोलिसांनी दारू भट्ट्या व विक्रीवर छापा टाकून कारवाई केली.
मात्र, त्यानंतर ही गावात दारूभट्ट्या व विक्री सुरू असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. पोलिसांच्या या कारवाईवर उलट सुलट चर्चा गावात सुरू आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्याने गावात शांतता व सुव्यवस्था राखून मतदान होण्यासाठी पोलिसांनी ठोस कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दारू धंदा चालवणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करून दारू धंदे पूर्णपणे बंद न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा मोहन सात्रस, शशिकांत कोकडे, आप्पा जाधव, भीमराव कुदळे यांनी दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.