पुणे

सुप्त मार्गाने वाजली एकतर्फी ‘तुतारी’

CD

संतोष शेंडकर : सकाळ वृत्तसेवा
सोमेश्वरनगर, ता. ५ : अजित पवारांनी पक्ष व चिन्हासह सोडलेली साथ...चंद्रकांत पाटलांची टिचकी आणि मंगलदास बांदलांनी घेतलेले तोंडसुख...‘५० वर्षात पवारांनी काय केले?’ असा मोदी-शहा-फडणवीसांनी विचारलेला जाब...असे श्रद्धास्थानावर घातलेले घाव न रूचल्याचा हिसका बारामतीकरांनी मताधिक्यातून दाखवला. ग्रामपंचायतींपासून साखर कारखान्यापर्यंतची समस्त अजस्त्र यंत्रणा ‘घड्याळा’सोबत असतानाही सर्वसामान्य मतदारांनी सुप्त मार्गाने एकतर्फी ‘तुतारी’ वाजविली. ‘मी काहीही निर्णय घेतले तरी विकासकामांमुळे बारामतीकर पाठीशी राहतील’ असे मतदारांना गृहित धरणेही अजितदादांच्या अंगलट आले.
सन २००९ मध्ये १ लाख ५ हजार, सन २०१४ मध्ये ९० हजार, सन २०१९ मध्ये १ लाख २७ हजार मताधिक्य देऊन सुप्रिया सुळे ‘सुरक्षित’ संसदेत पोचतील, याची काळजी बारामतीकरांनी घेतली होती. आता विरोधात खुद्द सुनेत्रा अजित पवार असल्याने त्याच मताधिक्य घेतील, अशी अटकळ भल्याभल्यांची होती. सुळेंना बूथसाठी तरी कार्यकर्ते मिळतील की नाही, अशी चर्चा होती. मात्र, सुप्त आणि संयमी बारामतीकरांनी सर्वाधिक ४८ हजारांचे मताधिक्य देत विरोधी गोटात खळबळ उडवून दिली. यामुळेच शरद पवार यांनीही, ‘यापेक्षा वेगळा निर्णय बारामतीकर घेणार नाहीत याची खात्री होती’ असे मार्मिक विधान केले आहे.
शिवसेना फोडल्यानंतर शरद पवारांच्या डोळ्यादेखत पक्ष, चिन्ह आणि नेते नेल्याने तालुक्यात भाजपबद्दल राग आणि ठाकरे-पवारांबद्दल सहानुभूती निर्माण झाली. अशात राष्ट्रवादीच्यांनीच पवारांवर टीका करणे बारामतीकरांना रुचले नाही. अजित पवार यांनीही अन्याय झाल्याची, त्यांचा पुत्र नसल्याची खंत व्यक्त करत पवारांचेच काही राजकीय डाव-प्रतिडाव उघड करण्याचा प्रयत्न केला. ‘भावनिक होऊ नका’ अशी सादही घातली. ‘विकास मीच करू शकतो’ असे पटवूनही दिले. पण याचा काडीमात्र परिणाम झाला नाही. काही कार्यकर्त्यांनीही ‘साहेबांनी तालुक्यासाठी काय केले?’ असा अवाजवी प्रश्न विचारून वातावरण चिघळवले. परिणामी दांडगा जनसंपर्क असलेल्या सुनेत्रा पवार यांच्यावर सुळे भारी ठरल्या. शरद पवार यांचा झंझावात, तसेच सुळे यांच्या संयत भाषणांना रोहित पवार यांचा मिळालेला ‘स्ट्रॅटेजिकल’ तडका आणि सामान्य कार्यकर्त्यांच्या कष्टातून विजयाची रेसिपी साधली.

नेत्यांवरील राग मतपेटीत
सुनेत्रा पवार यांच्यामागे सर्व सात जिल्हा परिषद सदस्य, चौदा पंचायत समिती सदस्य, अपवाद वगळता ९९ ग्रामपंचायतींचे सरपंच, अशी स्थानिक स्वराज्या संस्थेची तगडी फौज होती. सोमेश्वर व माळेगाव हे साखर कारखाने, दूध संघ, खरेदी विक्री संघ, बाजार समिती, सोसायट्या, बारामती बँक, जिल्हा बँक असा सहकाराचा तोफखाना होता. पण, उलट काही ठिकाणी नेतेमंडळींवरचाच राग मतपेटीतून व्यक्त झाल्याचे दिसते. ‘मलिदा गँग’ हा कंत्राटदारांबाबतचा शब्द निवडणुकीत प्रचंड गाजला. त्याचेच प्रत्यंतर म्हणून साम-दाम-दंड-भेद वापरूनही निंबूत, करंजेपूल, वाणेवाडी, मुरूम, होळ, मोरगाव, सुपे, वडगाव निंबाळकर, कोऱ्हाळे, माळेगाव, सांगवी, पणदरे अशा बड्या नेत्यांच्या गावात ‘तुतारी’ कान फाटेल इतपत घुमली. फक्त सात गावांत घड्याळाची टिकटिक आघाडीवर राहिली. त्यातून भविष्यातल्या निवडणुका एकतर्फी होणार नाहीत, यावरही शिक्कामोर्तब झाले आहे.

वंचित, ठाकरे गटाचा फायदा
‘आपला दादा’ भाजपसोबत गेल्याचे न रूचल्याने मुस्लीम बांधव आणि संविधानबदलाचा धोका वाटल्याने अनुसूचित जाती-जमातीचे बांधव यांचा सुप्रिया सुळे यांच्याकडे कल होता. जरांगे फॅक्टरही थोडा का होईना दिसला. सुळे यांना वंचित, ठाकरे गट यांनी पाठिंबा दिल्याचा फायदा दिसून आला. तुलनेने सुनेत्रा पवार या मित्रपक्षांच्या नेत्यांच्या गावातही मागे पडल्या आहेत.

अजित पवार यांची वाट बिकट
तालुक्याच्या खासदारकीला ताई आणि आमदारकीला दादा या सुत्रामुळे अजित पवार यांना सध्यातरी आमदारकीला धोका दिसत नाही. मात्र, त्यांची वाट सहजसोपी राहिली नाही. विरोधी उमेदवार कोण यावर वाट किती बिकट हे ठरेल. त्यामुळे गावोगाव उभ्या केलेल्या मनसबदारांना किती खांद्यावर घ्यायचे, आलिशान मोटारींचे किती नारळ फोडायचे आणि पवारसाहेबांना किती टोकाचा विरोध
करायचा, याचे टायमिंग ‘घड्याळा’ला आतापासूनच सेट करावे लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT