पुणे

फळबागांचे ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान

CD

संतोष शेंडकर ः सकाळ वृत्तसेवा
सोमेश्वरनगर, ता. ३ ः बारामती तालुक्याला मान्सूनपूर्व पावसाने झोडपलेच होते. शिवाय आता परतीच्या व अवकाळी पावसानेही कहर केला आहे. यामुळे खरीप हंगाम तर अडचणीत आलेलाच आहे. तसेच, पावसाने रब्बी हंगामाची तयारी करणेही मुश्कील झाले आहे. पिके नष्ट झाली नसली तरी, उसाच्या शेतात अजूनही पाणी असल्याने वजनात मोठी घट झाली असून नव्या उसाची चाळणी- बांधणी रखडली आहे.
पावसामुळे फळभाज्या, भाजीपाला पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव वाढला आहे. शिवाय उसासारखे प्रमुख पीकही तांबेरा, लोकरी मावा याने बाधित झाले आहे. गुलाबाच्या बागा थ्रीप्सने, तर अंजीर बागांचे व कांद्याचे करप्या रोगाने अडचणीत आल्या आहेत. तालुक्यात खरीप हंगामाची सुरुवात करण्याआधीच वळवाचा तब्बल ३०० ते ४०० मिलिमीटर इतका विक्रमी पाऊस कोसळला. त्यामुळे खरीप हंगाम आणि ऊस लागवडी लांबल्या. आघारकर कृषी संशोधन केंद्राच्या नोंदीनुसार जूनपासून ऑक्टोबर अखेर पुन्हा ४२७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. हा सगळा पाऊस सप्टेंबर, आक्टोबरमध्ये कोसळला आहे. यामुळे खरीपाच्या बाजरी, सोयाबीन, उडीद अशा पिकांची काढणी ऐन पावसाशी दोन हात करत शेतकऱ्यांना करावी लागली. त्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे. पावसाने नव्या ऊस लागवडी पाण्याखाली असून, तुटायला आलेल्या उसाचाही ओलावा हटला नाही. त्यामुळे तालुक्यातील सोमेश्वर व माळेगाव कारखान्यांचे गाळप रडतखडत कसेबसे सुरू आहे. नऊ हजार टन प्रतिदिन गाळप करू शकणारे हे कारखाने रस्त्याकडेचे फड शोधून पाच- साडेपाच हजार टनांपर्यंत गाळप करत आहेत.
सस्तेवाडी येथील शेतकरी पोपटराव बेलपत्रे म्हणाले, ‘‘पावसाने मेथी, कोथींबीर अशी पिके गेली. काकडी, घेवडा यावर करपा रोग दिसून येत आहे. माझ्यासह आसपासची ५० एकर गुलाबाची शेती थ्रीप्स रोगाने संपूर्णतः नष्ट झाली. बाजारात दीडशे १५०- २०० रुपये किलो गुलाब चालू आहे आणि शेतात फूल टिकत नाही. हवामान बदलाने शेतकरी गोत्यात गेलाय.’’

पिके रोगराईने ग्रस्त
पावसाळी वातावरणाने उसावर तांबेरा, लोकरी मावा याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. तसेच, तालुक्यातील टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, गवार, भेंडी, मिरची, मेथी, कोथींबीर अशी पिके रोगराईग्रस्त झाली आहेत. नव्या कांदा व हरभरा लागवडी पिवळ्या पडल्या आहेत. तालुक्यात अंजीर, डाळिंब, पेरू, सीताफळ या फळबागा घेतल्या जातात. फळबागांचे ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे.

माझे सात एकर अंजीर आहे. यावर्षी सतत पाऊस, ढगाळ वातावरण यामुळे अंजिराचे तांबेरा, करपा रोगाने ५० टक्के नुकसान झाले. फळबागांवर चिलटांचे, माशांचे, मिली बगचे प्रमाण वाढले आहे. प्रतिबंधात्मक औषध फवारणी करून बागा कशाबशा जपल्या आहेत. आठवड्याला औषध फवारणीने भांडवली खर्चात वाढ झाली आहे.
- दीपक जगताप, अंजीर उत्पादक, निंबुत

सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीत तालुक्यात ४३१ शेतकऱ्यांचे २३८ हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. तुलनेने मे महिन्यात जास्त नुकसान झाले होते.
- सचिन हाके, तालुका कृषी अधिकारी

मेमधील अतिवृष्टीचा परिणाम
फळभाज्या/भाजीपाला - २३४९ हेक्टर
फळबागा- ५०९ हेक्टर
जमीन नुकसान - ४९५ हेक्टर

सप्टेंबरमधील अतिवृष्टीने बाधित क्षेत्र
मंडल बाधित गावे बाधित शेतकरी बाधित क्षेत्र (हे.)
बारामती ४ ३४ १४.२०
उंडवडी सुपे ६ २९९ १५५.०५
वडगाव निंबाळकर २ ४१ १८
सुपे ३ ५७ ५१
एकूण १५ ४३१ २३८.२५

05051

Baramati Nagar Parishad Election : बारामतीत जय पवार यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्याची मागणी......

Train food vendor beat passenger Video : ‘’जेवण फार महाग आहे’’, एवढंच म्हटलं तर प्रवाशाला रेल्वेतच विक्रेत्यांनी पट्टा काढून बेदम मारलं!

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने सर जे. जे. समूह रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना नोटीस बजावली

पिंम्पल्स असलेली हिरोईन आम्ही का पाहायची... शिवानीला झालेल्या ट्रोलिंगवर अमित म्हणतो- तिच्या चेहऱ्यावर लिच लावले...

Tomorrow Horoscope Prediction : उद्या तयार होतोय अत्यंत शुभ सर्वार्थ सिद्धी योग, 5 राशींवर भगवान विष्णूची कृपा

SCROLL FOR NEXT