सोमेश्वरनगर, ता. ७ : करंजे (ता. बारामती) येथील श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान येथे दररोज महिनाभर काकड आरती पार पडली. तसेच, गुरुवारी (ता. ६) श्री सोमेश्वराच्या पालखीची सुमारे एक हजार भाविकांच्या उपस्थितीत मिरवणूक काढून पार्वती तलावात काकडा अर्पण करून उपक्रमाची सांगता करण्यात आली.
यानिमित्ताने महिनाभर मदत करणाऱ्या भाविकांचा सन्मान करण्यात आला. मंदिरात मागील ६० वर्षांपासून कोजागरी पौर्णिमा ते त्रिपुरारी पौर्णिमा या कालावधीत काकड आरती उपक्रमाची परंपरा आहे. पहाटे सोमेश्वराची पालखी पारंपरिक वाद्यांच्या तालावर काढण्यात आली. मंदिरानजीकच्या तलावात आरती करत काकडा अर्पण केला आणि पुन्हा पालखी मिरवत मंदिरात नेऊन ठेवण्यात आली. तसेच दिवसभर महाप्रसादाची सोय करण्यात आली होती. देवस्थान समिती व परिसरातील भाविकांनी चोख नियोजन केले. चालू वर्षी काकड आरतीला उपस्थित असणाऱ्या सर्व भाविकांना लोकसहभागातून नाश्ता तर देवस्थान समितीच्या वतीने चहाची सोय करण्यात आली होती.