सोमेश्वरनगर, ता. ८ : सोमेश्वर साखर कारखान्याने चालू हंगामात कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या उशिरा तुटणाऱ्या उसासाठी अनुदान जाहीर केले आहे. त्यामुळे फेब्रुवारीत तुटणाऱ्या उसाला १००, मार्चमध्ये तुटणाऱ्या उसाला २००, तर एप्रिलमध्ये तुटणाऱ्या उसाला ३०० रुपये प्रतिटन अधिकचा दर मिळणार आहे. तसेच, सोमेश्वर उच्चांकी ऊसदराची परंपराही कायम राखणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ‘सोमेश्वर’लाच ऊस घालावा, असे आवाहन अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी केले आहे. तसेच, ऊस न घातल्यास सर्व सोयी-सुविधा बंद केल्या जातील, असा इशाराही दिला आहे.
सोमेश्वर कारखान्याने पावसाशी संघर्ष करत गाळप हंगामाला वेग दिला आहे. आठ दिवसांत ४४ हजार टन गाळप झाले असून, उतारा १०.७७ टक्के इतका चांगला आहे. मार्चअखेर ऊस संपविण्याचा संचालक मंडळाचा मानस असून, १४ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. यादृष्टीने संचालक मंडळाने उशिराच्या गाळपासाठी गतवर्षापेक्षा अधिकचे प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. फेब्रुवारीत तुटणाऱ्या उसाला एकूण ऊसदरापेक्षा शंभर रुपये प्रतिटन अधिकचे मिळणार आहेत, तर मार्चमध्ये दोनशे व एप्रिलला तीनशे वाढवून मिळणार आहेत. शेतकऱ्यांनी दुबार पिकाच्या आशेने अन्यत्र ऊस घालू नये, यासाठी हे नियोजन केले आहे.
अध्यक्ष जगताप व उपाध्यक्ष मिलिंद कांबळे म्हणाले, ‘‘कार्यक्षेत्रातील सभासद, शेअर्स मागणीदार व कार्यक्षेत्रातील बिगर सभासद या सर्वांना या अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे. तसेच, शेतकऱ्यांनी नव्या लागवडी पाच फूट पट्टापद्धतीनेच कराव्यात, जेणेकरून ऊसतोडणी यंत्राद्वारे तोड करणे शक्य होणार आहे. गाळप हंगाम २०२६- २७मध्ये ऊसतोडणी यंत्राने तोडणी केलेल्या उसाला पन्नास रुपये प्रतिटन अनुदान देण्याचाही निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे.’’
एफआरपी ३२८५ रुपये प्रतिटन
सोमेश्वर कारखान्याची एफआरपी जिल्ह्यातील व आसपासच्या कारखान्यापेक्षा जादा म्हणजे ३२८५ रुपये प्रतिटन इतकी आहे. ‘सोमेश्वर’ने नेहमीच एफआरपीपेक्षा कितीतरी जास्त ऊसदर दिला आहे. चालू हंगामातही उच्चांकी दराची परंपरा कायम राखणार आहोत, अशी ग्वाही पुरुषोत्तम जगताप यांनी दिली. उच्चांकी ऊसदर, उशिरा तुटणाऱ्या उसाला अनुदान या निर्णयांमुळे नोंद केलेल्या शेतकऱ्यांनी अन्यत्र ऊस घालू नये, अन्यथा कारखान्याकडून दिली जाणारी साखर, बेणे, खते-औषधे, बियाणे, आदी सुविधा बंद होतील, असा इशाराही दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.