संतोष शेंडकर : सकाळ वृत्तसेवा
सोमेश्वरनगर, ता. २१ : राज्यातील १५० साखर कारखाने सुरवातीच्या वीस दिवसांत सुरू झाले असून, ५० कारखान्यांची धुराडी अजूनही विविध कारणांनी बंद आहेत. पावसामुळे हंगामाची सुरवात रडतखडत झाली, तरी आता मात्र हंगामाने वेग घेतला आहे. आतापर्यंत २० दिवसांत १२५ लाख टन उसाचे गाळप होऊन ९३ लाख ९३ हजार क्विंटल साखरनिर्मिती झाली आहे. अनुकूल हवामानामुळे चालू हंगामात साखर उतारा चांगला दिसत असून, कारखान्यांसाठी हा दिलासा ठरणार आहे.
राज्यात दोनशेपेक्षा अधिक साखर कारखाने आहेत. मात्र, काही कारखाने अडचणीत गेल्याने, तर काही परवाना नसल्याने सुरू झालेले नाहीत. १ नोव्हेंबरला हंगाम सुरू झाला, मात्र सुरवातीला परतीच्या पावसाने पहिले दहा दिवस अत्यंत जिकीरीचे गेले. त्यानंतर मात्र गाळपाला वेग आला आहे. आतापर्यंत ८० सहकारी आणि ७० खासगी कारखान्यांनी मिळून दहा टक्के म्हणजे १२५ लाख टन उसाचे गाळप केले आहे. गतहंगाम १५ नोव्हेंबरला सुरू झाल्याने २० नोव्हेंबरपर्यंत अवघे १७ लाख टन गाळप होते आणि साखर उताराही पावणेपाच टक्केच होता. चालू हंगामात साखर उतारा सुरवातीलाच ७.४७ टक्के इतका समाधानकारक आहे. सुरवातीला अनेक कारखाने ज्यूसपासून इथेनॉल आणि बी हेवीपासून इथेनॉलनिर्मितीकडे वळलेले असतानाही मिळालेला हा उतारा अत्यंत चांगला मानला जात आहे. तर, एकूण गाळपात कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्हे आघाडीवर आहेत.
याबाबत ‘सोमेश्वर’चे कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी सांगितले की, चांगला पाऊस आणि थंडीच्या कडाक्यामुळे हंगामाच्या सुरवातीलाच चांगला उतारा मिळत आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा व पुणे जिल्ह्यातील जवळपास वीसेक कारखान्यांचा उतारा दहा टक्क्यांपेक्षा अधिक असणे, हे चांगले संकेत आहेत.’’
उच्चांकी साखर उतारा (%) असणारे पहिले दहा कारखाने
राजारामबापू, साखराळे- १०.७०
राजारामबापू, वाटेगाव- १०.६५
राजारामबापू, करंदवाडी- १०.६०
मोहिते, रेठरे- १०.५५
क्रांतीअग्रणी- १०.४९
जवाहर, फलटण- १०.४४
हुतात्मा किसन अहिर- १०.३८
दत्त इंडिया- १०.३४
मोहनराव शिंदे- १०.३४
सोमेश्वर- १०.२५
साखर आयुक्तालयाच्या अहवालानुसार विभागनिहाय गाळप
विभाग कारखाने गाळप(लाख टन) साखर (लाख क्विं.)
कोल्हापूर ३१ ३१.६४ २७.२३
पुणे २४ २९.७६ २३.९८
सोलापूर ३२ २८.८५ १९.६५
अहिल्यानगर २२ १५.७६ १०.५९
छत्रपती संभाजीनगर १५ १०.४१ ६.४३
नांदेड २४ ८.२५ ५.२८
अमरावती २ १ ०.७७
नागपूर ० ० ०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.