शिरूर, ता. २० : व्यावसायिक कर्जासाठी जमीन गहाण ठेवूनही शिरूर तालुक्यातील शेतकऱ्याला कर्ज न देता कर्जाची सुमारे ५० लाख रुपयांची रक्कम परस्पर स्वतःच्या खात्यात वर्ग करून शेतकऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी पुरंदरचे माजी आमदार अशोक टेकवडे यांच्यासह दहाजणांविरूद्ध शिरूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
याबाबत सचिन बाळासाहेब गरुड (रा. गणेगाव दुमाला, ता. शिरूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, अशोक टेकवडे यांच्यासह त्यांचा मुलगा अजिंक्य, पत्नी विजया; तसेच दिलीप नारायण वेल्हेकर, बाळासाहेब मा. काळे, दिनेश श्रीकांत घोणे, भूषण सुभाष गायकवाड, सतीश महादेव जाधव, प्रदीप दिगंबर जगताप व गणेश अंकुश जगताप (सर्व रा. हडको रोड, सासवड, ता. पुरंदर) यांच्याविरूद्ध शिरूर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गरुड यांनी टेकवडे संस्थापक असलेल्या सासवड येथील अजित नागरी सहकारी पतसंस्था व अजित मल्टीस्टेट को- ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटीकडे मार्च २०१९ ला आपल्या ‘यशराज ॲग्रोफूडस’ या व्यवसायाच्या वाढीसाठी कर्जाची मागणी केली होती. त्यापोटी त्यांनी स्वतःसह पत्नी सोनाली व वडील बाळासाहेब यांच्या नावावरील गणेगाव येथील सुमारे अडीच एकर जमिनीचे गहाणखत करून दिले होते. त्यानुसार कर्ज मंजूर केल्याचे त्यांना सांगण्यात आले. मात्र, वेळोवेळी कर्ज रकमेची मागणी करूनही कागदपत्रे अपूर्ण असल्याचे सांगत कर्जाची रक्कम देण्यास टाळाटाळ केली. कागदपत्रांच्या अपूर्ततेमुळे आपले कर्जप्रकरण नाकारले असेल, असे वाटल्याने गरुड यांनी पाठपुरावा सोडून दिला होता.
दरम्यान, २५ सप्टेंबर २०२३ ला गरुड यांच्या कर्जप्रकरणातील जामीनदार महादेव रामभाऊ थोरात (रा. देलवडी, ता. दौंड) यांना गरुड यांच्या थकीत कर्जापोटी जमिनीचा ताबा मिळण्याबाबत दौंडच्या तहसीलदारांची नोटीस आल्याने गरुड व थोरात यांनी खोलात जाऊन चौकशी केली असता फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस आला.
या दरम्यान टेकवडे यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील काही व्यक्ती, संबंधित पतसंस्थांचे संचालक, खजिनदार यांनी गरुड यांची जमीन गहाण ठेवून त्यावर पन्नास लाख रुपये कर्ज मंजूर केले. त्यावेळी गरुड यांची सही असलेले वीस धनादेशही घेतले. या धनादेशांच्या आधारे कर्जमंजूरीची रक्कम संबंधितांनी संगनमत करून परस्पर आपल्या खात्यात वळविली व गरुड यांच्या परस्पर या रकमेची विल्हेवाट लावली. शिवाय फसवणूक करून उचललेल्या या कर्जाचे हप्तेही संबंधितांनी वेळेवर न भरल्याने थकीत कर्जापोटी जमीन जप्तीची नोटीस आल्याने ही फसवणूक उघडकीस आली.
फसवणूक झालेल्या गरुड यांनी न्यायालयात धाव घेतल्यानंतर शिरूर न्यायालयाचे न्यायाधीश सी. एम. खारगर यांनी शुक्रवारी (ता. १२) याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर शिरूर पोलिसांनी मंगळवारी (ता. १६) टेकवडे यांच्यासह दहाजणांविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
शिरूरचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रमेश कदम हे या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.