शिरूर, ता. २० : अष्टविनायक मार्गावर करडे (ता. शिरूर) नजीक चालकाचे नियंत्रण सुटून वाहन रस्त्यावर उलटल्याचा प्रकार ताजा असतानाच शनिवारी (ता.) सायंकाळी देशमुख वस्तीजवळ भरधाव टेम्पो चक्क शेतात घुसला. यामुळे कांदाचाळीचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर पळून चाललेल्या मद्यधुंद अवस्थेतील टेम्पोचालकाला स्थानिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
न्हावरेहून शिरूरच्या दिशेने चाललेला भरधाव टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट मधुकर भगवान देशमुख यांच्या शेतात घुसला. शेतातील फ्लॉवरच्या पिकातून गेलेल्या या टेम्पोने शेतात भरून ठेवलेल्या कोबी व फ्लॉवरच्या बॅगांचा आणि कांदा चाळीचा चुराडा केला. रस्त्यालगतच्या स्वच्छता गृहाचे तसेच एक वडाचे झाड आणि पदपथावरील दिव्यांच्या खांबांचेही टेम्पोच्या धडकेत नुकसान झाले. सुदैवाने शेतात कुणी नसल्याने व पाऊस पडत असल्याने वीजपुरवठा खंडित झालेला असल्याने मोठी दुर्घटना टळली.
अपघातानंतर मोठा आवाज झाल्याने घटनास्थळी मोठी गर्दी झाली. त्यावेळी घाबरलेल्या टेम्पोचालकाने टेम्पो जागेवरच सोडून पळ काढला. मात्र स्थानिक तरूणांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या अपघातात सुदैवाने मोठी दुर्घटना टळली असली तरी मधुकर देशमुख या शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले.
05655