सासवड, ता. २८ : सासवड (ता. पुरंदर) शहरात वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी पोलिस ठाण्यासमोरील चौक आणि जेजुरी नाका येथील चौक येथे नुकतेच नवीन वाहतूक नियंत्रक दिवे कार्यान्वित केले आहेत. मात्र, अनेक वाहनचालक, विशेषतः अवजड वाहनांचे चालक आणि दुचाकीस्वार वाहतुकीच्या नियमांना सर्रासपणे पायदळी तुडवत असल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे नियमांचे पालन करणाऱ्या प्रवाशांना आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.
वाहतूक नियंत्रक दिवे सुरू झाल्यानंतरही अनेक बेशिस्त वाहनचालक नियम तोडून पुढे निघून जातात. यामुळे नियमांप्रमाणे थांबणाऱ्या वाहनचालकांसोबत वादविवाद आणि बाचाबाची होण्याचे प्रकार वाढले आहेत. या दोन्ही ठिकाणी चौक असून, येथे वाहतूक नियंत्रक दिवे बसवण्यात आले असले तरी, अजूनही झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे मारलेले नाहीत. यामुळे पादचाऱ्यांना रस्ता नेमका कुठून ओलांडायचा, हे समजत नाही. तसेच, वाहनचालकांना सिग्नल लागल्यावर नेमके कुठे थांबायचे? याबाबतही संभ्रम निर्माण होत आहे. यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे.
पांढरे पट्टे मारण्याची गरज
या परिस्थितीवर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याची मागणी स्थानिक नागरिकांची आहे. या ठिकाणी त्वरित पांढरे पट्टे आणि परावर्तक पट्टे मारण्यात यावेत. यामुळे वाहनचालकांना नेमके कुठे थांबायचे, याची स्पष्ट कल्पना येईल आणि पादचाऱ्यांसाठीही सुरक्षित मार्ग उपलब्ध होईल. तसेच, वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्याची गरज आहे.
05509