सासवड, ता. १२ : आळंदी- पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण सुरू असून हडपसर- सासवड मार्गावरील पवारवाडी (ता. पुरंदर) गावाच्या वळणावर असलेले शतकानुशतकांचे जुने महादेवाचे मंदिर सध्या नव्या महामार्गाच्या रचनेमुळे रस्त्याच्या अगदी मध्यभागी आले आहे. त्यामुळे येथील वाहतूक धोकादायक झाल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. लोकभावना आणि विकास यात समतोल साधत हा प्रश्न मार्गी लावण्याची गरज आहे.
या ठिकाणी वाहतूक सुरू असताना चालकांना अचानकपणे रस्त्याच्या मधोमध मंदिर दिसते. रात्रीच्या वेळी अपुऱ्या प्रकाशामुळे परिस्थिती आणखी गंभीर आणि धोकादायक असल्याचे काही वाहनचालकांची सांगितले. याठिकाणी सुरक्षा व्यवस्था, चेतावणी फलक किंवा पर्यायी मार्ग नसल्याने अपघातांची शक्यता आहे.
ग्रामस्थांसाठी हे महादेवाचे मंदिर भावनिक श्रद्धास्थान आहे. अनेक पिढ्यांपासून इथे पूजाअर्चा सुरू आहे. त्यामुळे मंदिर हटविण्याचा विषय ग्रामस्थांना मान्य नाही. मात्र, सुरक्षा आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी रस्ते विकास कंपनी, महामार्ग प्राधिकरणाने ग्रामस्थांच्या सूचनेप्रमाणे मार्ग काढणे आवश्यक आहे.
छत्रपती शिवरायांच्या काळापासून आमचं महादेवाचे मंदिर पिढ्यानपिढ्या इथे आहे. हसाजी बुवांची समाधी, तसेच संत सोपानकाका महाराजांच्या पादुकाही इथे आहेत. आमचे अनेक सण- उत्सव या ठिकाणी साजरे होतात. आमचा विकासाला विरोध नाही, पण आमच्या श्रद्धेचे केंद्र नष्ट करून नाही. महामार्ग प्राधिकरणाने येथे संपादित केलेल्या जागेत हे मंदिर आता आहे तसेच, त्याच दगडांत उभे करून द्यावे.
- प्रकाश पवार, ग्रामस्थ, पवारवाडी
याबाबत ग्रामस्थांशी बैठक झाली आहे. संपादित केलेल्या जागेत ग्रामस्थांच्या सूचनेप्रमाणे मंदिर बांधण्याची आमची तयारी आहे. पितृपक्ष झाल्यानंतर याबाबत कार्यवाही सुरू होईल.
- राजेंद्र ढगे, प्रकल्प व्यवस्थापक, टी अँड टी कंपनी
05602