जीवन कड : सकाळ वृत्तसेवा
सासवड, ता.१३ : सासवड (ता.पुरंदर) येथील श्रेणी १ च्या पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत भव्य आहे. हा दवाखाना सासवड-सोनोरी मार्गालगतच आहे. मात्र, एक्स रे मशिन ० उपलब्ध नाही. यामुळे पशुपालकांना जनावरांना ३३ किलोमिटर अंतरावरील शिरवळ (ता. खंडाळा) येथे घेऊन जावे लागते. यामुळे त्यांचा पैसा व वेळ दोन्ही वाया जात आहे. परिणामी दवाखान्यात येणाऱ्या पशुपालकांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे.
पशुवैद्यकीय अधिकारी पद रिक्त असल्याने दिवे येथे पूर्ण वेळ रुजू असलेले सहायक पशुधन विकास अधिकारी अविनाश धायगुडे हे सासवड येथील अतिरिक्त काम करतात. दवाखान्यात पिण्याचे, वापराचे पाणी, स्वच्छतागृहाची टाकी आदींची सुविधा आहे. पशुरुग्णवाहिका व त्यासाठी चालक आणि वैद्यकीय अधिकारी म्हणून शासननियुक्त सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी वाय. डी. पाटील यांची उपलब्धता आहे.
यांची आहे गरज
- इमारतीच्या प्रांगणात पेव्हिंग ब्लॉक
- अत्याधुनिक एक्स रे मशिन
- सोनोग्राफीची सुविधा उपलब्ध
- कॅल्शियम, मिनरल मिक्चर
एप्रिल ते ऑक्टोबर २०२५ ची स्थिती (पुरंदर तालुका)
कृत्रिम रेतन केंद्र... ...१९
कृत्रिम रेतन संख्या....... ३१७०
वंध्यत्व निर्मूलन संख्या..........२००३
वंध्यत्व निर्मूलन मोहिमा.... ३० गावांत
पशुवैद्यकीय शिबिरे.... ९३
प्रागतिक गर्भ तपासणी... ३६८४
प्रागतिक जन्मलेली वासरे.... १२४८
पशुवैद्यकीय पथकं.... २ (दरमहा ५० गावांना भेट)
लसीकरण
लंपी..........१४५
लाळ्या खुरकत.... ५६ हजार (पुरंदर तालुका)
वैरण बियाणे वितरण (पुरंदर तालुका) ......मका (१० हजार किलो)
विविध योजनांतील लाभार्थी... ४०
रिक्त पदे (पुरंदर तालुका)
पशू संवर्धन अधिकारी... २
व्रणोपचार.......१
परिचर.......९
प्रक्रिया मंत्रालय स्तरावरून सुरू
जनावरांच्या गरजेनुसार कॅल्शियम, मिनरल मिक्चर देण्यात येते. यावर्षीचे चारा बियाणे १५ दिवसांत उपलब्ध होईल. कर्मचाऱ्यांबाबतीतील शेतकऱ्यांच्या तक्रारींची चौकशी करण्यात येईल. तसेच पशुवैद्यकीय अधिकारी रिक्त पदाबाबत, खात्याच्या पुनर्रचनेनुसार सासवड येथे सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन पदोन्नतीने येणार असून, प्रक्रिया मंत्रालय स्तरावरून सुरू असल्याची माहिती डॉ. अस्मिता कुलकर्णी यांनी दिली.
सासवड येथील पशुवैद्यकीय दवाखाना (श्रेणी १) येथे पशुपालकांनी जंतनाशके, मिनरल मिक्चर, चाटण विटा यांचा लाभ घ्या. एफ-एम-डी व लंपी रोगांचे लसीकरण वेळेवर करून घ्या. दवाखान्यातील उच्च प्रतीच्या वीर्य मात्रा वापरून कृत्रिम रेतन करा, जेणेकरून जास्त दूध देणाऱ्या संकरित कालवडी मिळतील. पशुधनाच्या आरोग्यासाठी
आणि दुग्धोत्पादन वाढवण्यासाठी सासवड दवाखान्याशी संपर्क साधा.
- डॉ. अस्मिता कुलकर्णी, पशुधन विकास अधिकारी पुरंदर.
गेल्या सहा महिन्यांपासून पशुवैद्यकीय अधिकारी नाही. सरकारी दवाखान्यात कॅल्शियम, मिनरल मिक्चर मिळत नाही. उपचारांसाठी खासगी पशुवैद्यकांना जास्त पैसे द्यावे लागतात, तसेच अनुदानित मका बियाण्यासाठी मदतनीस पैसे मागतो. या अडचणींमुळे जनावरे विकण्याची वेळ आली आहे.
- सागर जगताप, पशुपालक सासवड.
06001