सासवड, ता. १९ : कोडीत (ता. पुरंदर) येथील श्रीनाथ म्हस्कोबा महाराज मंदिराच्या जवळून गेलेल्या कोडीत ते नारायणपूर या महत्त्वाच्या रस्त्याची अक्षरशः दुर्दशा झाली आहे. सुमारे दीड किलोमीटर अंतराच्या या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
हा रस्ता धार्मिक आणि दैनंदिन वापराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. दर रविवारी, गुरुवारी, पौर्णिमा, अमावस्या आणि सुट्ट्यांच्या दिवशी हजारो भाविक याच मार्गाचा वापर करून श्रीनाथ म्हस्कोबा महाराज मंदिर, तसेच जवळच असलेले श्रीक्षेत्र नारायणपूर, पुरंदर किल्ला आणि श्रीक्षेत्र बालाजी मंदिर केतकावळे या ठिकाणी ये- जा करीत असतात. तसेच कोडीत, भिवडी, नारायणपूर, पोखर या गावांतील शेतकरी आणि विद्यार्थी दैनंदिन कामासाठी याच रस्त्याचा वापर करतात. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे खड्ड्यांमधून मार्ग काढताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने लक्ष द्यावे आणि रस्त्याचे काम त्वरित सुरू करावे, अशी मागणी स्थानिक नागरिक व वाहनचालकांनी केली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या महत्त्वाच्या रस्त्याची दुरुस्ती करून भाविक आणि स्थानिकांचा प्रवास सुखकर करावा.
- संजय बडदे, ग्रामस्थ कोडीत
पुणे ग्रँड चॅलेंज सायकल स्पर्धा याच मार्गावरून जाणार आहे. या अनुषंगाने पुढील आठवडाभरात या रस्त्याचे काम सुरू होणार आहे.
- ओंकार रेळेकर, कनिष्ठ अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग
06019