पुणे

मावळच्या उद्योगांत ‘एआय’ पर्व

CD

तळेगाव दाभाडे औद्योगिक वसाहतीतील अनेक अग्रगण्य कंपन्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वेगाने स्वीकार सुरू केला आहे. उत्पादनक्षमता वाढवणे, वाहतूक साखळी सुलभ करणे आणि अत्याधुनिक यांत्रिक प्रणालींचा विस्तार या तीनही क्षेत्रांत तळेगाव आज राज्यातील अत्यंत गतिशील औद्योगिक पट्टा ठरत आहे. पारंपरिक यंत्रसामग्रीऐवजी स्वयंचलित ‘बुद्धिमान रोबोट यंत्रणा’ बसविण्यास अनेक कंपन्यांनी सुरुवात केली असून संशोधन-विकास विभागांत उत्पादन प्रक्रियेतील विलंब, अडथळे आणि मालवाहतुकीसंबंधी समस्यांवर उपाय शोधण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत.
--------------------------------

तळेगाव औद्योगिक वसाहतीच्या स्थापनेपासून येथे उद्योगवाढ अखंडपणे सुरू आहे. चौथा आणि पाचवा टप्पा पूर्ण क्षमतेकडे आला आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाची जवळीक, जेएनपीटीशी असलेली प्रभावी दळणवळणाची सोय आणि आगामी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी मिळणारी सहज जोडणी या तिहेरी लाभांमुळे तळेगावची औद्योगिक आकर्षणशक्ती अनेक पट वाढली आहे. भौगोलिक अनुकूलता, पुरेसा पाणीसाठा आणि भक्कम पायाभूत सुविधा यामुळे वाहन उद्योग, साठवण-व्यवस्था आणि पुरवठा साखळी व्यवस्थापनाची मजबूत पायाभरणी येथे झाली आहे. यामागे स्थानिक राजकीय स्थैर्याचा महत्त्वाचा वाटाही आहे.

कौशल्य विकासातील बदल
तळेगाव, कान्हे, सोमाटणे, आंबी आणि वराळे परिसरातील शैक्षणिक संस्थांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, स्वयंचलन आणि कौशल्याधारित प्रशिक्षणाला प्राधान्य देण्यास सुरुवात केली आहे. नूतन, डी. वाय. पाटील, प्रतिभा, पीसीईटी आणि इंद्रायणी या संस्थांतून बाहेर पडणारे कौशल्यसंपन्न विद्यार्थी उद्योगांतील कुशल कामगारांची रिक्त जागा भरून काढत आहेत.

वाहतुकीत ‘एआय’चे उपाय
अवजड वाहनांचे उत्पादन, उत्खनन यंत्रे, चारचाकी वाहने आणि लष्करी साहित्याची निर्मिती तळेगावात मोठ्या प्रमाणावर होते. मात्र, महामार्गांची दुरवस्था, वाहतूक कोंडी आणि वेळेवरील निर्बंध यामुळे वाहतूक खर्च वाढतो. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने मालसाठवण, वाहतूक नियोजन आणि मार्गनिश्चिती अधिक अचूकपणे करता येईल. यामुळे इंधन, वेळ आणि मनुष्यबळाचा खर्च लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो.

उद्योजकांची ठोस भूमिका
उद्योगातील स्पर्धात्मकता टिकवण्यासाठी तंत्रज्ञानावर आधारित बदलांचा दीर्घ इतिहास आहे; परंतु कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभाव अत्यंत वेगवान आणि क्रांतिकारक आहे. तळेगावातील स्थानिक उद्योजकही या बदलात सक्रिय सहभागी झाले आहेत. रामदास काकडे यांच्या आरएमके समूहाने उभारलेल्या साठवण उद्यानाला कोरिया, चीन आणि जर्मनीमधील उद्योगसमूहांचे सहकार्य मिळत आहे. जेसीबी, भारताचे प्रमुख दीपक शेट्टी यांनी उत्पादन रेषा पूर्णपणे रोबोट व्यवस्थेवर आणण्याचा संकल्प व्यक्त केले. तसेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथील वाहन उद्योगांत मानवी श्रमाऐवजी कृत्रिम बुद्धिमत्तेची उपकरणे वेगाने येत असल्याचे प्रतिपादन केले होते.

रोजगारकपातीची भीती
नव्या तंत्रज्ञानामुळे रोजगार कपात होईल, अशी भीती व्यक्त होत आहे; परंतु इतिहास सांगतो की, प्रत्येक नवे तंत्रज्ञान नवीन प्रकारच्या संधी निर्माण करते. कृत्रिम बुद्धिमत्ता ही पुढील औद्योगिक उत्क्रांतीची पायरी असून योग्य कौशल्य आत्मसात केले, तर मावळचा औद्योगिक पट्टा आगामी दशकात राज्याच्या औद्योगिक नकाशावर अग्रगण्य स्थान मिळवेल, यात शंका नाही.

उड्डाणातून विकासाकडे झेप
मुंबई–पुणे द्रुतगती मार्गालगत असल्यामुळे तळेगाव औद्योगिकदृष्ट्या ‘सुवर्ण त्रिकोणाशी’ जोडले गेले आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ,
जेएनपीटी बंदर आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ. चाकण औद्योगिक वसाहत, पिंपरी चिंचवड औद्योगिक पट्टा आणि हिंजवडी माहिती-तंत्रज्ञान उद्यानाच्या जवळीकतेमुळे मालवाहतूक, वितरण आणि मनुष्यबळाची उपलब्धता सहज मिळते.

रोजगाराने आर्थिक सक्षमीकरण
तळेगाव इलेक्ट्रॉनिक आणि अभियांत्रिकी नगरीमुळे सुमारे दोन लाखांहून अधिक रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठा आधार मिळणार आहे. उद्योगांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी निवासी प्रकल्प उभारले जात आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवडवरील लोकसंख्येचा ताण कमी करण्यातही या प्रकल्पांचा लाभ होत आहे.

आत्मनिर्भरतेकडे वाटचाल
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगाच्या पार्श्वभूमीवर तळेगाव औद्योगिक वसाहत एक नियोजनबद्ध, आधुनिक आणि आत्मनिर्भर वसाहत म्हणून उभारी घेत आहे. आंद्रा धरणातून पाण्याचा पुरवठा, रुग्णालये, शाळा, महाविद्यालये, भोजनगृहे, माहिती-तंत्रज्ञान उद्याने, साठवण केंद्रे या सर्व सुविधांमुळे तळेगाव उत्पादन आणि माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगारांसाठी आदर्श निवासक्षेत्र ठरत आहे.

प्रमुख ठिकाणांपासून अंतर
चाकण औद्योगिक वसाहत - ११ किमी, पिंपरी चिंचवड औद्योगिक पट्टा - २५ किमी, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग - ८ किमी, पुणे शहर - ४० किमी, पुणे विमानतळ - ४५ किमी, नवी मुंबई - १०० किमी, जेएनपीटी बंदर - १०० किमी, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ - १०५ किमी.

गुंतवणूकदारांचे उदयोन्मुख केंद्र
उद्योग आणि निवासी भागांचे सक्षम समायोजन, धोरणात्मक स्थान, उत्कृष्ट पायाभूत सुविधा आणि विस्तृत रोजगारसंधी या सर्व घटकांमुळे तळेगाव महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासातील एक महत्त्वाचे केंद्र बनत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगारंभात मावळचा औद्योगिक पट्टा कात टाकत आगामी दशकाचे नवे मानदंड निर्माण करेल, यात तिळमात्र शंका नाही.

तळेगाव एमआयडीसी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Female News Anchor Suicide : खळबळजनक! महिला न्यूज अँकरची चॅनलच्या ऑफिसमध्येच गळफास लावून आत्महत्या

Smriti - Palash Wedding: 'स्मृतीच्या वडिलांच्या प्रकृतीमुळे...', भाऊ पलाशचं लग्न लांबणीवर पडल्यानंतर पलक मुच्छलची पोस्ट

Sunidhi Chauhan Concert : ‘देसी गर्ल’च्या मैफिलीची उत्सुकता; ‘स्वास्थ्यम्’ मध्ये ६ डिसेंबरला ‘सुनिधी चौहान कॉन्सर्ट’!

Palghar News : मोखाड्यात प्रसुत मातेची बाळाला घेऊन जंगलातुन २ किलोमीटर पायपीट; रूग्णवाहीका चालकाने अर्ध्यावरच सोडल्याने ओढवला प्रसंग!

Latest Marathi News Live Update : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT