नागनाथ शिंगाडे, सकाळ वृत्तसेवा
तळेगाव ढमढेरे, ता. १३ : कोंढापुरी (ता. शिरूर) हे ऐतिहासिक व निसर्गाचा वारसा लाभलेले पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील महत्त्वाचे गाव. गावात पारंपरिक शेती व्यवसायाबरोबरच अलीकडील काळात जागतिकीकरणामुळे उद्योगीकरणाला चालना मिळाली आहे. गावाच्या पूर्वेला कामिनी ओढ्याच्या कडेला शासकीय तलाव आहे. तलावाची लांबी सुमारे सहा किलोमीटर असून मोठ्या प्रमाणात पाणी साठवण क्षमता आहे.
तलावाच्या सांडव्यातून वाहणारा नैसर्गिक धबधबा हा पंचक्रोशीतील पर्यटकांचे आकर्षण ठरला आहे. १९७२ च्या दुष्काळात झालेला पाझर तलाव व छोटे-मोठे मातीचे नाले असून काही वर्षापूर्वी गावासाठी उन्हाळ्यातील दोन ते तीन महिने चासकमान धरणाचे पाणी वेळेत येत नसल्याने दुष्काळी परिस्थिती जाणवत होती. गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या मार्गदर्शनाखाली युवा वर्ग एकत्र येऊन ग्रामपंचायतीसह विविध संस्थांच्या माध्यमातून तीन ओढ्यांचे खोलीकरण व रुंदीकरण केले. गावातील पाझर तलाव ते निमगाव म्हाळुंगी शिवेपर्यंत तसेच कवठेमळा ते निमगाव रस्त्याच्या शिवेपर्यंत दोन ओढ्यांचे व गावातील इतर ठिकाणी सुमारे साडेचार किलोमीटर ओढा खोलीकरण व रुंदीकरण केले. लोकसहभागातून सुमारे १५ लाख रुपये निधी गोळा करून तीन पोकलेन मशिन, दोन जेसीबीच्या साह्याने ग्रामस्थांनी दीड महिना जलसंधारणाचा उपक्रम राबविला. ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, विविध संस्था पदाधिकारी आणि औद्योगिक कंपन्यांच्या मदतीने काम पूर्ण झाले. जलसंधारणाच्या कामात खोलीकरणांमध्ये एकूण मोठे ३२ मातीचे बंधारे तयार केल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.
जलसंधारणाचे काम झाल्यानंतर ओढ्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात आले. गावचे कुलदैवत श्री खंडोबा मंदिराच्या परिसरात देशी वड, पिंपळ, उंबर, बेल, नारळ, कवठ, अंजन, चिंच, कडुनिंब, करंज,बहावा, भोकर, चाफा अशा एकूण ११११ वृक्षांची लागवड केली. वृक्षारोपणाबरोबरच वृक्ष संवर्धनास प्राधान्य दिले. सद्यःस्थितीत या वृक्षांची संख्या सुमारे पाच हजारांपेक्षा अधिक गेलेली असून लहान वृक्षांना संरक्षक जाळी बसवणे, वृक्षांना कंपाउंड करणे, पाणी घालणे हे काम ग्रामस्थ स्वयंप्रेरणेने करत आहेत. लोकसहभागातून उभारलेल्या जलसंधारणाच्या कामाची कृषी विभाग व जिल्हा परिषद जलसंधारण विभागाने पाहणी केली. गावातील लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तीन सिमेंट बंधारे बांधण्यात आले आहेत. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे.
हे उपक्रम राबवतात
शासनाच्या माध्यमातून मनरेगा, बिहार पॅटर्न, गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार अशा योजना राबवून गाव प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. जलसंधारणाबरोबरच वृक्षारोपण करून कन्या वन, ऑक्सिजन पार्क, बिबवा, अडुळसा, अशोक आदी वनस्पतींचे औषधी वन असे विविध उपक्रम वृक्ष संवर्धनाच्या निमित्ताने राबवले जात आहेत.
कोंढापुरी ग्रामविकास फाउंडेशनच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान, ज्येष्ठ नागरिक संघ वाचनालय, रुग्णवाहिका सेवा तसेच लोकसहभागातून अंगणवाडी सुधारणा कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.
भविष्यामध्ये राळेगणसिद्धी, हिवरे बाजार, पाटोदा यासारखी ओळख कोंढापुरी गावची तयार होईल असा संकल्प ग्रामस्थांनी केला आहे.
- धनंजय गायकवाड, अध्यक्ष, कोंढापुरी ग्राम विकास फाउंडेशन
गावातील विविध उपक्रम पंचक्रोशीत आकर्षण व प्रेरणादायी ठरले असून जलसंधारण व वृक्ष संवर्धन उपक्रमासाठी असंख्य युवक, उद्योजक व ग्रामस्थ जोडले आहेत. आगामी काळात गावतील पर्यावरण संवर्धनाचा आलेख आणखीन उंचावलेला दिसेल.
- विनय गायकवाड, युवा उद्योजक, कोंढापुरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.