तळेगाव ढमढेरे, ता.२३: कोंढापुरी (ता.शिरूर) येथील पुरातन ऐतिहासिक काळात बांधलेल्या पाणवठ्याच्या दुर्लक्षित बारवचे पुनरुज्जीवन करण्यात आले. त्याचा उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला.
बाबूराव दौंडकर स्मारक समिती व सेवावर्धिनी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बारव पुनरुज्जीवन व पुनर्वापर प्रकल्पांतर्गत येथील ऐतिहासिक बारवच्या समोर व बाजूने मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे विभाग संघचालक संभाजी गवारे, प्रभाकर मुसळे, सूर्यकांत शिर्के, रुद्रा नंदन, विकास ठाकरे, वेरनोन कारटोझो तसेच सेवावर्धिनीचे व्यवस्थापक गिरिजा सिरशीकर, प्रकल्प अधिकारी आमोद काटेकर तसेच बाबूराव दौंडकर स्मारक समितीचे सहसचिव नारायण शिंदे, वैभव कुलकर्णी, सूरज दामोदर व ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान, येथील ऐतिहासिक बारवची पाहणी राष्ट्रपती पारितोषिक विजेते धनंजय गायकवाड, सरपंच संदीप डोमाळे, माजी ग्रामपंचायत सदस्य दिनेश गायकवाड, ग्रामसेवक राजाराम रासकर, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी केली. यावेळी ऐतिहासिक बारवचे पुनरुज्जीवन करण्यात आल्याने सेवावर्धिनी संस्थेचे तसेच बाबूराव दौंडकर स्मारक समितीचे व ग्रामपंचायतीचे कौतुक करण्यात आले.
बारव पुनरुज्जीवनासाठी सुमारे सहा लाख रुपये खर्च झाला असल्याचे श्री गायकवाड यांनी सांगितले.
चौकट: पाणवठयाची बारव नंदा पद्धतीची असून दक्षिणेकडून पायऱ्यांची मूळ जागा आहे. बारवचे बांधकाम तीन टप्प्यांचे असून, पश्चिमेला दोन कोणाडे मध्यभागी रहाट आहे. उत्तरेला देवकोष्ठात मध्यभागी शिलालेख आहे त्यानुसार ही बारव शालिवाहन शके १६३१ इसवी सन १७०३ मध्ये बांधण्यात आलेली आहे. तसेच देवकोष्ठात शंकराची पिंड, नंदी, गणपती आणि एक भंगलेली मूर्ती आहे.
देवकोष्ठाच्या वर उजव्या बाजूस भिंतीवर मारुतीची प्रतिमा आहे. अशा या पुरातन ऐतिहासिक बारवचे पुनरुज्जीवन झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. आता या बारावेतील पाण्याचा ग्रामस्थ कसा उपयोग करतात हे भविष्यात दिसून येईल.
08494, 08495
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.