संजय बारहाते : सकाळ वृत्तसेवा
टाकळी हाजी, ता. ८ : दाट उसाने वेढलेलं गाव...प्रत्येक वाटेत सळसळणारा आवाज...आणि मनात कायम धडकी भरवणारी ती एकच सावली, बिबट्याची! पिंपरखेड सहा हजार लोकसंख्या असलेलं हे गोड उसाचं गाव बिबट्यांच्या कडू आठवणीने आज अक्षरशः भीतीच्या गर्तेत जगतंय.
पहाटे सूर्य उगवतो, आणि गावकरी पिकांना पाणी द्यायला, जनावरांना चारा आणायला शेतात निघतात. पण प्रत्येक पावलावर मनात एकच प्रश्न, ‘आज परत बिबट्या दिसेल का?’ हे गाव दाभाडे मळा, आंबेवाडी, डोंगरवस्ती, दत्तवाडी, वरे मळा, गायकवाड मळा, पोखरकर मळा, ढोमेमळा, अशा अनेक वस्त्यांत विखुरलेलं. प्रत्येक वस्तीत उसाचं घनदाट जंगल. या उसातून बिबट्यांचे हालचाली रोज दिसतात. ‘भीती ही आता नवलाई नाही, ती जगण्याचा भाग बनली आहे,’ असं गावकऱ्यांचं शब्दात न मावणारं दुःख आहे.
पिंपरखेडचा ऊस भीमाशंकर साखर कारखान्याला तब्बल ४५ हजार टन, तर इतर कारखान्यांना ३५ हजार टनांपर्यंत जातो. मेहनतीने उभं केलेलं हे संपन्न शेतीचं गाव आज भयाचं प्रतीक बनलं आहे. गेल्या काही महिन्यांत गावाने दोन निरागस जिवांना गमावलं आहे. शिवन्या (वय ५ वर्षे ६ महिने), रोहन (वय १२) या चिमुकल्यांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला.
‘शेतात गेलं की वाटतं, आता तो कुठून उडी मारेन काय?’ असं एका शेतकऱ्याचं वाक्यच भयाचं वास्तव सांगतं. चारही बाजूने ऊस, त्यात भाजीपाला आणि जनावरांसाठीचा चारा. ‘काम करावं की बिबट्यावर लक्ष ठेवावं, हेच कळत नाही,’ असं शेतकरी सांगतात. घरांच्या भिंतीलगत ऊस वाढलेला आहे; वेगवेगळ्या मालकांच्या जमिनी असल्याने ‘ऊस लावू नका’ असं सांगणंही अवघड झालंय.
आज पिंपरखेडच नाही, तर जांबूत, चांडोह, फाकटे, वडनेर, टाकळी हाजी, कवठे येमाई, संविदणे, निमगाव दुडे, मलठण, आमदाबाद अण्णापूरसह संपूर्ण घोड- कुकडीचा पट्टा, शिरूर, जुन्नर, आंबेगाव, खेड या तालुक्यांवर भीतीचं गडद सावट आहे. वनविभागाचे अधिकारी प्रयत्न करत आहेत, पिंजरे लावले आहेत. काही बिबटे पकडून वनतारा (गुजरात) येथे हलविण्याची तयारी सुरू आहे.
पण तोवर गावकऱ्यांच्या मनातून भीतीचे ढग सरतील का?
‘तो पुन्हा आला तर?’
सध्या प्रत्येक शेतकरी, प्रत्येक आई, प्रत्येक मूल अक्षरशः जीव मुठीत घेऊन जगतंय. रात्री गावावर शांतता उतरते, पण उसाच्या पानांतून पुन्हा हलकी सळसळ होते...आणि संपूर्ण गाव श्वास रोखून थांबतं. ‘तो पुन्हा आला तर?’ उसाच्या घनदाट शिवारात पसरलेलं पिंपरखेड गाव जिथे प्रत्येक सावलीत बिबट्याची भीती दडलेली आहे. ‘माझं बाळ शाळेत गेलं की मन घरात राहत नाही,’ असं सांगताना एका आईचा गळा दाटून येतो. मुलं आता एकटी शाळेत जात नाहीत; पालक स्वतः गाड्यांवर ने-आण करतात. पण तरीही मनातला बिबट्या शांत होत नाही. ‘
महिला सर्वाधिक असुरक्षित
‘भीती वाटते...पण पोटाची गरज भागवायची आहे. बाळं शिकवायची आहेत, संसार चालवायचा आहे, त्यासाठी शेतातं राबावचं लागेल ना भाऊ...’ असं सांगताना एका महिलेच्या डोळ्यातील पाणी सगळं सांगून जातं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.