टाकळी हाजी, ता. १३ : बिबट्याच्या वाढत्या हल्ल्याने बिबटप्रवण क्षेत्रातील गावांतील मुलांच्या सोयरिक जमणेही अवघड झाले आहे. त्यामुळे वरपित्यांपुढे नवीन संकट उभे राहिले आहे.
चासकमान आणि कुकडी प्रकल्पामुळे या भागात शेतीला पाणी मिळाले आणि गावागावात बागायत फुलले. एकेकाळी उजाड असणाऱ्या माळरानावर आता ऊस, डाळिंब, कांदा, भाजीपाला अशी पिकं दिसू लागली. झोपड्यांच्या जागी बंगले उभे राहिले, सायकलच्या जागी चारचाकी वाहने उभी राहू लागली. पैसा, ऐश्वर्य, आणि शहरी झळाळी गावाकडे आली. पण या समृद्धीच्या सावलीत आता भयाने घर केले आहे.
पिंपरखेड (ता. शिरूर) परिसरात अलीकडे झालेल्या बिबट्याच्या सलग हल्ल्यांनी संपूर्ण परिसर हादरला आहे. शेतात गेलेला माणूस संध्याकाळपर्यंत घरी परत येईल की नाही, याची खात्री राहिलेली नाही. आई संध्याकाळी आपल्या लेकराची वाट पाहतेय, पण मनात सतत एकच प्रश्न माझे मूल सुखरूप परत येईल ना? शिवारात काम करणे आता जिवावर आले आहे. कुठून बिबट्या येईल, कुठून झडप घालेल, याचा थांगपत्ता नाही. गावात रात्री शांतता असते, पण त्या शांततेत भीतीचा आवाज घुमतो. बिबट्या पुन्हा आला तर?
या भीतीने आता गावकऱ्यांच्या सामाजिक आयुष्यावरही गडद सावली टाकली आहे. तरुणांच्या लग्नाची गोष्ट निघाली की बाहेरगावचे पालक विचारतात, तुमच्याकडे पैसा, जमीन सगळे आहे, पण आमच्या मुलीच्या सुरक्षेचे काय? या प्रश्नाला गावकऱ्यांकडे उत्तर नाही. परिणामी अनेक तरुणांची सोयरिक ठरूनही अडकून पडली आहे. पिंपरखेड परिसरासह शिरूर तालुक्यात बिबट्यांच्या हल्ल्यांवर नियंत्रण आणण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अन्यथा ग्रामीण भागाचे जगणेच बंद होईल, अशी मागणी या भागातील नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.