थेऊर, ता. १८ : येथे चार दिवसांपूर्वी मुसळधार पाऊस पडला व ओढे, नाले, मोऱ्या बुजवून नैसर्गिक जलस्त्रोत कायमस्वरूपी बंद केल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. या पुरात शेतमालाचे व पशुधनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या पूरपरिस्थितीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी शिक्षण संस्था चालक प्रसादराव पाटील यांच्यासह ६ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी कोलवडी (ता. हवेली) येथील ग्राम महसूल अधिकारी अर्जुन नागनाथ स्वामी (वय ३७, रा. वाघोली, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शिक्षण संस्था चालक प्रसादराव दत्ताजीराव पाटील, दिलीप कुंजीर, दत्तात्रेय महादेव चव्हाण, सुषमा महेश थोरात (सर्व रा. थेऊर, ता. हवेली), गोविंद जिवन उत्तमचंदानी व राजेश जीवन उत्तमचंदानी (दोघेही रा. सिस्का हाऊस, एअरपोर्ट रोड, साकोरनगर, लोहगाव, पुणे), अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत.
थेऊर फाटा ते थेऊर रस्त्यावरील कांबळे वस्ती व रुकेवस्ती परिसरात पावसामुळे १५ सप्टेंबर रोजी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. प्रसादराव पाटील यांनी थेऊर ग्रामपंचायत हद्दीतील गट नंबर ६३मध्ये त्यांच्या क्षेत्रालगत संरक्षण मिल बांधल्याने ओढ्याचे पात्र अरुंद झाले आहे. थेऊर येथील गट नंबर १६३ व १६४ मध्ये दिलीप कुंजीर, दत्तात्रेय चव्हाण, सुषमा थोरात यांनी शासनाची कोणतीही परवानगी न घेता ओढ्याचे पात्र बुजवून त्यावर अनधिकृत प्लॉटींग केले आहे. तर, गोविंद उत्तमचंदानी व राजेश उत्तमचंदानी या दोघांनी थेऊर येथील गट नंबर ६६३ मध्ये जमीन खरेदी केली व ओढ्याचे पात्र बुजवून त्यावर अनधिकृत प्लॉटींग केले आहे.
नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहामध्ये अडथळा निर्माण केल्यामुळे पूरस्थिती निर्माण होऊन मानवी जीवन धोक्यात येऊ शकते, याची जाणीव असताना देखील वरील सहाही जणांनी हे काम केले आहे. निर्माण केलेल्या अडथळ्यामुळे रुकेवस्ती येथे नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने त्यांचे जनजीवन विस्कळित झाले. शेतीचे, शेतमालाचे व पशुधनाचे प्रचंड नुकसान झाले,अ शी तक्रार लोणी काळभोरच्या अतिरिक्त तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांच्यातर्फे प्राधिकृत अधिकारी म्हणून अर्जुन स्वामी यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार सहाही जणांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ नाळे करीत आहेत.