सुनील जगताप
थेऊर : कधीकाळी राज्य सरकारचा डॉ.आनंदीबाई जोशी पुरस्कार मिळालेल्या कुंजीरवाडी आरोग्य केंद्रात सुविधांची वानवा असून डॉक्टरांच्या उशिरा येण्यामुळे रुग्णांना उपचार मिळण्यास उशीर होत आहे. अशीच काहीशी परिस्थिती थेऊर उपकेंद्राची असल्याने ही दोन्हीही केंद्रे कोमात असल्याचे रुग्णांचे म्हणणे आहे.
कुंजीरवाडी आरोग्य केंद्रात एकूण १४ कर्मचारी नियुक्तीस आहेत. त्यापैकी २ वैद्यकीय अधिकारी,२ आरोग्य सहाय्यक,१ महिला आरोग्य सहाय्यक, १ लॅब तंत्रज्ञ,१ औषध निर्माता, ३ आरोग्य सेवक, २आरोग्य सेविका,१ क्लार्क व ३ शिपाई अशी वर्गवारी आहे. या आरोग्य केंद्राच्या अखत्यारीत आळंदी म्हातोबा, थेऊर, नायगाव, सोरतापवाडी ही उपकेंद्रे येतात. यापैकी सोरतापवाडी हे उपकेंद्र नव्याने सुरू झाले असल्याने तेथील कर्मचारी आस्थापना अजून मंजूर झालेली नाही. पूर्वी मंजूर असलेल्या कर्मचारी वर्गाच्या मदतीने या उपकेंद्राचे काम सुरू केले आहे.
कुंजीरवाडी नियुक्तीस असलेल्या दोन्ही वैद्यकीय अधिकारी महिला आहेत. आरोग्य केंद्रातील ओपीडीची सुरुवात सकाळी ८.३० वाजता होणे बंधनकारक असताना या ठिकाणी सोमवारी (ता. ३) सकाळी ९.१५ पर्यंत एकही डॉक्टर उपस्थित नव्हता मात्र रुग्णांची चांगली उपस्थिती होती. ९.२० ला देशमुख नावाचे प्रशिक्षणार्थी डॉक्टर आल्यावर त्यांनी ओपीडी सुरू केली. या प्रशिक्षणार्थी डॉक्टरांकडे वैद्यकीय अधिकारी कधी येणार अशी विचारणा केल्यावर त्यांनी रूपाली बंगाळे नामक वैद्यकीय अधिकाऱ्यांना फोन लावला व तुम्ही कुठे आहात असे विचारले असता, त्यांनी सांगितले की, मी गाडी घसरून पडल्याने माझ्या गुडघ्याला दुखापत झाली आहे, त्यामुळे मी एक्स रे काढण्यास जाणार आहे. तर दुसऱ्या वैद्यकीय अधिकारी लोखंडे या ९.४५ च्या दरम्यान दवाखान्यात आल्या व माझे आधार कार्ड हरवले आहे ते मिळवण्यासाठी मी आधार केंद्रात गेले होते, त्यामुळे उशीर झाला, मी दररोज नऊच्या दरम्यान दवाखान्यात येते असे सांगितले. यामुळे ओपीडी सुरू करायला नेहमीच सकाळी पावणेदहा ते दहा वाजतात त्यावर शिक्कामोर्तब झाले.
निडल बाहेरून घेऊन या
तपासणीसाठी आलेले रुग्ण मात्र याबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार करत नव्हते. ओपीडीत रुग्णांना तपासताना इंजेक्शन देण्याची गरज असली की, त्या रुग्णाला डॉक्टर इंजेक्शनची निडल(सुई)बाहेरून घेऊन या असेच सांगत होते, त्यावर डॉक्टरांनी सांगितले की, सरकारकडून पुरवठा होताना आमच्याकडे ज्या निडल्स् येतात त्या आम्हाला फक्त नियमित लसीकरणासाठीच वापरता येतील एवढाच होत असल्याने, इतर रुग्णांना इंजेक्शन देताना आमच्याकडे शासनाकडून मिळालेल्या निडल्स् उपलब्ध नसतात. मागणी करूनही वेळेवर पुरवठा होत नाही, त्यामुळे रुग्णाला ती आणण्यास सांगावे लागते.
परिसरामध्ये अस्वच्छता
सध्या ऑनलाइन पद्धतीने औषधांची व साधनांची मागणी नोंदवावी लागते. मध्यवर्ती पुरवठा अधिकाऱ्याकडे जी औषधे व साधने उपलब्ध असतात त्याची मागणी ठराविक कालावधीत नोंद केली नाही तर,ऑनलाइन पद्धतीत पुन्हा लॉगिंन करायला तीन तास वाट पहावी लागते. त्यामुळे आपल्याला हवी असलेली साधने अथवा औषधे मिळतीलच याची शाश्वती नसते, अशी माहिती या चौकशी दरम्यान मिळाली. आरोग्य केंद्राच्या परिसरामध्ये अस्वच्छता त्याचप्रमाणे आरोग्य केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वारावर असलेला बोर्ड फाटला असून लोंबत आहे याकडेही या आरोग्य केंद्राच्या प्रमुखांचे दुर्लक्ष झाले आहे.
थेऊर येथील इमारत गळकी
थेऊर येथील उपकेंद्राची तीच गत आढळून आली, सकाळी ९.२५ पर्यंत या उपकेंद्राच्या गेटचे कुलूप उघडलेले नव्हते. या उपकेंद्राच्या इमारतीचे बांधकाम २००३ साली झाले. स्लोप असलेला स्लॅब असूनही याठिकाणी सर्वत्र पाण्याची गळती मोठ्या प्रमाणात होत आहे. डॉक्टरांनी कोठे बसावे व रुग्णांची तपासणी कोठे करावी, अशी अवघड परिस्थिती या उपकेंद्राची आहे. या ठिकाणी नऊ कर्मचाऱ्यांची नियुक्ती आहे. मात्र, सकाळी साडेनऊ पर्यंत एकही कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित नव्हता. हळूहळू तीन कर्मचारी साडेदहा पावणेअकरा पर्यंत उपस्थित झाले होते. डॉ. शिल्पा दलाल
यांनी सांगितले की, पावसाळ्यात अक्षरशः पाणी वाहत होते.
00323
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.