उरुळी कांचन, ता. २५ : पुणे- सोलापूर महामार्गावर असणाऱ्या तळवाडी चौकात दररोज होत असलेली वाहतूक कोंडी नागरिक, वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत होती. ही कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांनी चौकात दुभाजक लावून वाहने पुढील बाजूने वळविण्यात आली आहेत. मात्र, या दुभाजकावरून जीव धोक्यात घालून नागरिक, विद्यार्थी, महिला ये- जा करीत आहेत.
उरुळी कांचन (ता. हवेली) येथील चौकातून एक मार्ग दौंडकडे, तर दुसरा मार्ग सासवड, जेजुरीकडे जाण्यासाठी, तर तिसरा मार्ग हा उरुळी कांचन गावात जाणारा आहे. हा चौक वर्दळीचे ठिकाण तर आहेच पण अपघाताचे ठिकाणही झाले आहे. त्यात आणखीन एक भर म्हणजे तळवाडी चौकात पुणे- सोलापूर महामार्गावरच एसटी, पीएमपीचा थांबा आहे. महामार्गाच्या दुतर्फा रिक्षाचा देखील थांबा आहे. उरुळी कांचन गावात अनेक शैक्षणिक संस्था आहेत. त्यामुळे सहजपूर, कोरेगाव मूळ, बोरीऐंदी अशा आजूबाजूच्या गावातून हजारो विद्यार्थी उरुळी कांचन येथे शिक्षण घेण्यासाठी येतात. त्यांना याच मार्गाने ये- जा करावी लागते. या ठिकाणी उड्डाणपूल करण्याची मागणी होत आहे. मात्र, हा प्रश्न अद्याप सुटलेला नाही.
पुणे- सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन ते भिगवण पर्यंतचे पक्क्या स्वरूपात दुभाजक बसविण्याचे काम सुरू आहे. येथील तळवाडी चौकात तात्पुरत्या स्वरूपात दुभाजक लावले आहेत. येत्या दोन दिवसात तिथे काँक्रिटीकरण करून पक्क्या स्वरूपात दुभाजक बसविण्यात येईल आणि तो चौक बंद करण्यात येईल.
- तुकाराम देवकर, ठेकेदार
सायंकाळी पाच वाजता शाळा सुटल्यावर पुणे- सोलापूर महामार्गावर अनेक विद्यार्थी बसची वाट पाहत थांबतात. उरुळी कांचन- शिंदवणे रस्त्याने जाण्यासाठी विद्यार्थी हे दुभाजकावरून अक्षरश: उड्या मारतात, वाकून, सरकून जातात. उड्या मारताना विद्यार्थ्यांचा तोल जाऊन जीवित हानी होऊ शकते. या ठिकाणी शाळा सुटल्यावर वाहतूक पोलिस असणे अपेक्षित आहे.
- सुरेश देशपांडे, शिक्षक
वाहतूक कोंडीचा प्रश्न उरुळी कांचन पोलिस प्रशासनाकडून सोडविण्यात आलेला आहे. अपघात आणि वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवले आहे. या दोन महिन्यात कोणत्याही प्रकारचा अपघात, जीवित हानी झालेली नाही. यापूर्वी महिन्याला दोन किंवा तीन अपघातात होत होते. राष्ट्रीय महामार्गाकडून काँक्रिटीकरण करून पक्क्या स्वरूपात दुभाजक बसविण्याचे काम अद्याप बाकी आहे. हे काम वेळेत झाले असते मात्र, पावसामुळे हे काम राहिले आहे. शाळा सुटण्याच्या वेळेत पोलिस कर्मचारी तेथे कार्यरत असतील.
- शंकर पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, उरुळी कांचन
03349
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.