पाटस, ता. २५ ः पुणे- सोलापूर महामार्गावर दौंड तालुक्यातील मुख्य रस्ता व सेवा रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत महामार्ग प्रशासन संवेदनशील दिसत नाही. महामार्गावरील वरवंड, पाटस, कुरकुंभ, मळद दरम्यान प्रवाशांचा प्रवास खडतर झाला आहे. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी विचित्र अवस्था झाल्याने यातून मार्ग काढताना वाहनचालकांची पुरती त्रेधातिरपीट उडत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची लक्षणीय वर्दळ असते. पाटस टोल नाक्यावर रोज लाखो रुपयांची टोलवसुली होते. मात्र, संबंधित महामार्ग व टोल प्रशासनाचा दुरुस्ती विभाग प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने असंवेदनशीलपणाची चादर पांघरून आहे. त्यामुळे या मार्गावर रोज किरकोळ अपघात होत आहेत. काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे महामार्गावर, तसेच सेवा रस्त्याची खड्ड्यांमुळे पुरती चाळण झाली आहे. रस्त्याच्या दुतर्फा मधोमध किंवा इतर बाजूला मोठ्या आकाराचे खड्डे पडले आहेत. पाटस हद्दीतील भागवतवाडी, वरवंड हद्दीतील पुलावर पडलेले खड्डे अक्षरशः अपघातांना निमंत्रण देत आहे.
महामार्गावरील वाहनांचा वेग जास्त असल्याने खड्ड्यांत वाहने आदळतात. अनेक वाहने खड्ड्यांत गेल्याने टायर पंक्चरचे प्रकार वाढले आहेत. रात्रीच्या वेळी मोठ्या आकाराचे खड्डे अचानक समोर आल्याने अचानक ब्रेक दाबल्याने पाठीमागून येणारे वाहन समोरच्या वाहनाला धडकून अपघात घडतात.
रुग्णावाहिकेतील रुग्णांना त्रास
महामार्गावरील खड्ड्यांचा रुग्णवाहीकेतील गर्भवती किंवा प्रसुतीसाठी जाणाऱ्या महिलांना मोठा त्रास होत आहे. त्यांच्या आरोग्याला देखील धोका संभवतो. त्यामुळे संबंधित टोल प्रशासन व महामार्ग प्रशासनाने यावर तत्काळ दखल घ्यावी, अशी मागणी प्रवासी व वाहनचालक करीत आहेत.
महामार्वरील खड्ड्यांमुळे प्रवाशांचे हाल होतात. रस्त्याची तत्काळ दुरुस्ती होणे गरजेचे आहे. तसेच, नविन सेवा रस्त्याचे काम गतीने व्हावे. त्याठिकाणी नव्याने गटार वाहिनीची व्यवस्था करावी.
- डॉ. मधुकर आव्हाड, ग्रामस्थ
00588
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.