वडापुरी, ता. १६ : इंदापूर तालुक्यात थंडीचा कडाका मोठ्या प्रमाणात वाढल्याने रब्बी हंगामातील पिकांच्या पेरण्यांना वेग आला आहे. सध्या रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मका, करडई, इत्यादी पिकाच्या पेरण्या शेतकरी ट्रॅक्टरच्या सहाय्याने करत असताना इंदापूर तालुक्यात पहावयास मिळत आहे.
सध्या इंदापूर तालुक्यात सकाळ व संध्याकाळ दाट धुके पडत आहे. त्यामुळे थंडीचा जोर वाढत चालला आहे. पेरण्यांसाठी वाढत्या थंडीने पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाची पेरणीसाठी लगबग पाहायला मिळत आहे.
यंदा समाधानकारक पाऊस पडल्याने थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील गहू पेरणीसाठी शेतकऱ्यांचा मोठा कल वाढला असल्याचे चित्र आहे. गव्हाची पेरणी २० डिसेंबरपर्यंत केली जाते. त्यामुळे आणखी मोठ्या प्रमाणात गव्हाच्या पेरणीत वाढ होणार आहे. सध्या तापमानात चांगलीच घट झाल्याने रब्बी हंगामातील पेरणी झालेली गहू, हरभरा, करडई आदी पिके जोमदार येतील,असे मत वडापुरी येथील शेतकरी रामभाऊ अभंग यांनी व्यक्त केले.
02868