वेल्हे, ता. १७ ः राजगड तालुक्यातील पानशेत व वरसगाव धरणासाठी जलसंपदा विभागाने या भागातील जमिनी संपादित करून येथे
धरणांची निर्मिती केली. धरण बांधून शिल्लक राहिलेल्या जमिनी या मूळ शेतकऱ्यांच्या ताब्यात देण्यात याव्यात, अशी मागणी पुणे जिल्हा दूध संघाचे माजी अध्यक्ष भगवानराव पासलकर यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता हनुमंत गुणाले व पुणे जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता हनुमंत धुमाळ यांच्याकडे मंगळवारी (ता. १७) निवेदनाद्वारे केली आहे.
पानशेत व वरसगाव धरणांमुळे या भागातील स्थानिक नागरिक विस्थापित झाले आहेत. शेती नसल्याने मोलमजुरी करत आहे. यावर पोटपाण्यासाठी, धरणांसाठी संपादित झालेल्या जमिनी मात्र धरणांपासून दूर अंतरावर या जमिनी आहेत. याठिकाणी स्थानिक नागरिक हा हॉटेल, किराणा दुकान, दूध डेअरी असे व्यवसाय चालवत आहेत. जलसंपदा विभागाने या भागातील स्थानिक लोकांना संपादित जमिनीमध्ये वसवावेत, असे या निवेदनात म्हटले आहे.
निवेदन देताना किरण राऊत, रमेश शिर्के, बाबा पानसरे, अशोक मोरे, शांताराम ठाकर, राजेश लोहकरे, प्रशांत देशपांडे, माऊली कांबळे, गणेश पोरे, गणेश तारू आदींसह शेतकरी उपस्थित होते.