वालचंदनगर, ता. १५ : इंदापूर तालुक्यामध्ये रविवारी (ता. १४) जोरदार पावसाने हजेरी लावली. पावसाच्या पाण्यामुळे सणसरच्या ओढ्याला पहाटे साडेतीन वाजण्यास सुमारास पूर आला आला. पुराचे पाणी ओढ्याकाठच्या शेतकऱ्यांच्या घरात घुसले. त्यामध्ये शेळ्या, कोंबड्यासह ओढ्याकाढच्या शेतकऱ्यांच्या जमीनी वाहून गेल्या असून, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.
इंदापूर तालुक्यामध्ये रविवारी रात्री जोरदार पावसाने हजेरी लावली. काझड, निंबोडी, शिंदेवाडी, लाकडी परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरु होता. या परीसरातील सर्व पाणी सणसरच्या ओढ्याला मोठ्या प्रमाणात आले. पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास नागरिक साखर झोपेमध्ये असतानाच सणसरच्या ओढ्याला अचानक पूर आला. पुराचे पाणी सणसर बाजारतळाच्या परिसरामध्ये घुसले. तसेच, भैरवनाथ मंदिरापर्यंत पुराचे पाणी आले होते. पुराच्या पाणी घरात घुसल्यामुळे अनेक नागरिकांच्या घरातील साहित्य पावसाच्या पाण्याने वाहून गेले. तसेच, ओढ्याकाठी राहणाऱ्या नागरिकांच्या शेळ्या, कोंबड्या वाहून गेल्या. गावामधील व्यावसायिकांचे दुकानामध्ये पाणी घुसले असून, नुकसान झाले आहे.
रायतेमळा परिसरामध्ये पुराचे पाणी शिरल्यामुळे नुकसान झाले. विजेचे खांब पडल्यामुळे सणसर परिसरामध्ये काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. सणसरच्या पुलावरून, तसेच बाजूने पाणी वाहत असल्यामुळे बारामती- इंदापूर रस्त्यावरील वाहतूक काही काळासाठी बंद होती.
सणसरच्या पुराची माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार जीवन बनसोडे, गटविकास अधिकारी सचिन खुडे, वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजकुमार डुणगे, सरपंच यशवंत पाटील, ग्रामसेवक सचिन पवार यांनी तातडीने पुरस्थितीची पाहणी करून नागरिकांना मदत कार्याला सुरवात केली. ग्रामपंचायतीच्या वतीने सोमवारी दिवसभर पुराच्या पाण्यामुळे झालेला माती दगडाचा राडारोडा हटविण्याचे काम सुरु होते. तसेच, ग्रामपंचायतीने पूरग्रस्तांना पाणी व जेवणाची सोय केली होते. पूरग्रस्तांना सणसर ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच यशवंत पाटील यांच्यासह खरेदी विक्री संघाचे संचालक अमोल भोईटे व अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी मदतीचा हात दिला.
झोपमध्ये असताना आला पूर
सणसरच्या ओढ्याला पुर आल्यामुळे सचिन खोमणे, जगदीश शेलार, बाळासाहेब निंबाळकर, मनिषा खोमणे, बाळासाहेब काळे, श्रीकांत काळे, तात्या खोमणे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. घरातील साहित्य, शेतामधील मका व कडवळ पिके वाहून गेली आहेत. यासंदर्भात सचिन खोमणे यांनी सांगितले की, आम्ही पहाटे साडेतीन वाजता झोपेमध्ये असताना घरामध्ये पाणी घुसण्यास सुरवात झाली. घरातील साहित्य पुराच्या पाण्यात वाहून गेले आहे. तसेच शेळ्या, कोंबड्या व जनावरे वाहून गेले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.