वालचंदनगर, ता. १४ : कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य वैशाली पाटील यांच्यासह अनेकांचे जिल्हा परिषद गट राखीव झाल्यामुळे इंदापूर तालुक्यातील इच्छुकांच्या आशेवर फिरले आहे. बावडा गटामधून हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील- ठाकरे यांना दुसऱ्यांदा संधी निर्माण झाली आहे. तालुक्यामध्ये आरक्षणाच्या सोडतीनंतर कही खुशी- कही गमचे चित्र पहावयास मिळाले.
कृषिमंत्री भरणे यांचा बालेकिल्ला असलेला बोरी- वालचंदनगर जिल्हा परिषदेचा गट अनुसूचित महिलेसाठी राखीव झाला आहे. या गटामध्ये २०१२मध्ये भरणे विक्रमी मतांनी विजयी झाले होते. तसेच, सन २०१७ला राष्ट्रवादीच्या वैशाली प्रतापराव पाटील विजयी झाल्या होत्या. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीकडून माजी सदस्य प्रतापराव पाटील, बाजार समितीचे माजी उपसभापती रोहित मोहोळकर इच्छुक होते. मोहोळकर यांनी विधानसभेला हर्षवर्धन पाटील यांच्या गटामधून राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला होता. मात्र, गट राखीव झाल्यामुळे प्रतापराव पाटील व रोहित मोहोळकर यांच्या आशेवर पाणी फिरले आहे. पळसदेव- बिजवडी गट या गटातून जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने विक्रमी मतांनी विजयी झाले होते. हा गट नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाला आहे. लासुर्णे- सणसर गटामध्ये इच्छुकांची संख्या जास्त होती. मात्र, सर्वांच्या अपेक्षेवर पाणी फिरले आहे. भिगवण शेटफळगढे गट सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाला असून, या गटामधून दोन्ही पक्षाकडून इच्छुकांची गर्दी होणार आहे. माळवाडी- वडापुरी हा गट सर्वसाधारण जागेसाठी खुला असून माजी जिल्हा परिषद सदस्य अभिजित तांबिले यांच्यासाठी दुसऱ्यांदा संधी निर्माण झाली आहे. निमगाव केतकी- शेळगाव गट सर्वसाधारण महिलेसाठी खुला आहे. या गटामध्ये राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षामधून इच्छुकांची गर्दी होणार आहे. या गटामध्ये हर्षवर्धन पाटील यांच्या गटाच्या माजी जिल्हा परिषद सदस्य भारती मोहन दुधाळ विजयी झाल्या होत्या. त्यांना दुसऱ्यांदा निवडणूक लढविण्याची संधी मिळू शकते. राष्ट्रवादी कॉग्रेसकडून या गटामध्ये इच्छुकांची संख्या जास्त आहे. काटी- लाखेवाडी जिल्हा परिषद गट सर्वसाधारण जागेसाठी खुला असून, राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले इच्छुक आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून माजी सभापती विलास वाघमाडे इच्छुक आहेत. बावडा-लुमेवाडी हा गट सर्वसाधारण महिलेसाठी खुला असून, या गटामधून दोन्ही पक्षामध्ये इच्छुकांची संख्या जास्त आहे. या गटातून अंकिता पाटील- ठाकरे दुसऱ्यांचा निवडणूक लढवू शकतात.
पश्चिम भागात निराशा
इंदापूर तालुक्यातील पश्चिम भागातील बोरी- वालचंदनगर व लासुर्णे- सणसर हे दोन्ही गट जिल्हा परिषदेसाठी अनुसूचित महिला या जागेसाठी राखीव झाले आहेत. तसेच, या दोन्ही गटातील तीन गण पंचायत समितीसाठी राखीव झाले असून, दोन्ही गटातील इच्छुकांना धक्के बसले. छत्रपती साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी न मिळालेले अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना जिल्हा परिषद व पंचायत समितीची उमेदवारी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, गट व गण राखीव झाल्यामुळे इच्छुकांच्या पदरी निराशा पडली आहे.
गटनिहाय आरक्षण- भिगवण- शेटफळगढे- सर्वसाधारण महिला, पळसदेव- बिजवडी- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, माळवाडी-वडापुरी- सर्वसाधारण, निमगाव केतकी- शेळगाव- सर्वसाधारण महिला, बोरी- वालचंदनगर- अनुसूचित जाती महिला, लासुर्णे- सणसर- अनुसूचित जाती महिला, काटी- लाखेवाडी- सर्वसाधारण, बावडा- लुमेवाडी- सर्वसाधारण महिला.
मागील पक्षीय बलाबल
राष्ट्रवादी कॉंग्रेस- ४, कॉंग्रेस- ३.
प्रमुख समस्या -
संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे काम रखडले आहे. नीरा नदीवरील बंधाऱ्यामध्ये जास्तीजास्त पाणी अडविण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.