वालचंदनगर, ता. १२ भवानीनगर (ता. इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्यात १ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर या दरम्यान ९६७०१ टन उसाचे गाळप झाले आहे. या कालावधीमध्ये गाळप झालेल्या उसाचे ३१०१ रुपये प्रतिटन प्रमाणे पहिला हप्ता २९.९८ कोटी रुपये सभासदांच्या खात्यावर बुधवारी (ता. १०) जमा करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, उपाध्यक्ष कैलास गावडे व संचालक मंडळाने दिली.
कारखान्याचा गळीत हंगाम १ नोव्हेंबर पासून सुरू झाला आहे. कारखान्याने १६ दिवसांत १ लाख टन गाळपाचा टप्पा पूर्ण केला होता. तर ४१ व्या दिवशी ३ लाख टन गाळपाचा टप्पा पूर्ण केला आहे. कारखान्याने गुरुवारी (ता. ११) ४१ व्या दिवशी ३ लाख ६ हजार ३५६ टन ऊस गाळप केले असून ३ लाख १४ हजार ५०० क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे. गुरुवारी साखरेचा उतारा (रिकव्हरी) ११.३८ टक्के मिळाला असून सरासरी रिकव्हरी १०.५५ टक्के झाली आहे. कारखान्याने सहवीजनिर्मिती प्रकल्पातून ९५ लाख २ हजार युनिट वीज महावितरणला निर्यात केली आहे. कारखाना क्षमतेपेक्षा अधिक गाळप करीत असून सभासदांच्या जास्तीतजास्त उसाचे गाळप करण्याचा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान, संचालक मंडळाने १२ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. सभासद कारखान्याला सहकार्य करीत आहेत. उशिरा तुटणाऱ्या खोडव्यांना १०० रुपये प्रतिटन, सुरू व पूर्व हंगामी उसाला ७५ रुपये प्रतिटन अनुदान देण्यात येणार असून सभासदांनी सर्व ऊस गाळपासाठी आपल्या श्री छत्रपती कारखान्याला देण्याचे आवाहन संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.