वाल्हे, ता. ७ : वाल्हे गावात (ता. पुरंदर) आद्यरामायणकार महर्षी वाल्मीकी ऋषी जयंतीनिमित्त विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत मोठ्या उत्साहात साजरी केली. दिवसभर गावात उत्साहाचे वातावरण अनुभवायला मिळाले. महर्षी वाल्मिकींच्या प्रतिमेची पारंपरिक वाद्यांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत भव्य मिरवणूक काढण्यात आली. तसेच रक्तदान शिबिर, हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण असे विविध कार्यक्रमही या दिवशी पार पडले.
वाल्हे येथील समाधीचे राज्यभरातून आलेल्या शेकडो भाविकांनी दर्शन घेतले. यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. पहाटे बबन महाराज भुजबळ व मारुती रोकडे यांसह राष्ट्र कोळी संघाच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते महाभिषेक झाला. त्यानंतर भाविकांनी समाधी व पादुकांवर अभिषेक केला. सकाळी पारंपरिक वाद्यांच्या तालावर महर्षी वाल्मीकी ऋषींच्या प्रतिमेची आकर्षक मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीची सुरुवात माजी सरपंच अमोल खवले व कोळी राष्ट्रसंघाचे संस्थापक अध्यक्ष गोकूळ कोळी, कोळी राष्ट्रसंघाचे महाराष्ट्र अध्यक्ष बळीराजे वाघमारे यांच्या हस्ते प्रतिमा पूजनाने झाली. याप्रसंगी मोहन पवार, प्रवीण कुमठेकर, अमित पवार, दादासाहेब मदने, अशोक महाराज पवार, दत्तात्रेय पवार, प्रल्हाद पवार, सचिन देशपांडे, सचिन आगलावे, राजेंद्र लंबाते, कांतिलाल पवार, सूरज शहा, पांडुरंग पवार, मदन भुजबळ आदी मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. मिरवणुकीदरम्यान ‘राम नामाचा जयघोष’ आणि हलगी वादनाने उत्सवाला अधिकच रंगत आणली.
‘जय श्रीराम’च्या घोषात संपूर्ण गाव राममय झाले होते. टाळ-मृदुंग, झांज आणि हलग्यांच्या तालावर गावकरी आणि कोळी समाज बांधव नाचत-गात मिरवणुकीत सहभागी झाले होते. रस्त्याच्या दुतर्फा उभ्या राहिलेल्या ग्रामस्थांनी महर्षींच्या प्रतिमेचे दर्शन घेत जयघोष केला.
मिरवणुकीनंतर लोणी काळभोर येथील चैतन्य महाराज शिंदे यांनी महर्षी वाल्मीकी ऋषींचे जीवनचरित्र आणि समाजासाठी केलेले कार्य यावर आधारित प्रवचन केले. दुपारी टाळ-मृदुंगाच्या निनादात ‘पुंडलिक वरदा हरी विठ्ठल’च्या जयघोषात समाधिस्थळी फुलांचा वर्षाव केला. महर्षी वाल्मीकी ऋषी जयंतीनिमित्त वाल्हेकर ग्रामस्थ व कोळी समाज बांधवांच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरातील ४२ रक्तदात्यांना मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तूंचे वाटप केले. सात दिवसीय अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित केला आहे. कार्यक्रमास डि. एन. कोळी, पोलिस उपनिरीक्षक केशव जगताप, हवालदार भाऊसाहेब भोंगळे, हनुमंत जमादार, माणिक महाराज पवार, सदाशिव वानखेडे, सागर कोळी, पुरुषोत्तम बुंदे आदींनी उपस्थिती लावली.