वाल्हे, ता. १० : पुरंदर तालुक्यातील वागदरवाडी (ता. वाल्हे) परिसरात गुरुवारी सायंकाळी बिबट्याचे थेट दर्शन झाल्याची घटना घडली. परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनी वनविभागाकडे तातडीने उपाययोजनांची मागणी केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून पंचक्रोशीत बिबट्याचे पाळीव जनावरांवर हल्ले आणि शेतशिवारातील वावर वाढलेला दिसून येत आहे. गुरुवारी (ता. ९) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास वागदरवाडी गावठाण ते सातरांजण डोंगरपायथ्याजवळील बेलदरा भागात चार-पाच तरुण धावण्याचा नियमितपणे सराव करत होते. तेव्हा विहिरीशेजारी बिबट्या फिरताना त्यांच्या नजरेस पडला. बिबट्याला जवळून पाहिल्याने एक तरुण क्षणभर गोंधळला, मात्र प्रसंगावधान राखून मोठ्या शिताफीने तरुणांनी तातडीने घटनास्थळावरून पळत गावात बिबट्या दिसल्याचे सर्वांना सांगत सतर्क केले. ग्रामस्थांना याबाबत माहिती दिल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली. शेतीच्या कामाचा हंगाम सुरू असल्याने शेतकऱ्यांचा व मजुरांचा शिवारात सतत वावर असतो. अशा वेळी बिबट्याच्या उपस्थितीमुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. माजी उपसरपंच सचिन पवार आणि कांतिलाल भुजबळ यांनी वनविभागाने तत्काळ पिंजरा लावून बिबट्यास पकडावे, अशी मागणी केली आहे. या घटनेबाबत वनपाल दीपाली शिंदे यांनी सांगितले की, शेतात व जंगलाजवळ एकटे जाऊ नये. शक्यतो समूहाने फिरावे. हातात बॅटरी व काठी असावी. महिला व बालकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.