वाल्हे, ता. ३० : पुरंदर तालुक्यातील वाल्हे परिसरात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे. रविवारी (ता. २८) रात्री वरचामळा येथे एका वासराचा बिबट्याने फडशा पाडल्याची घटना घडली असतानाच, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी सोमवारी (ता. २९) पातरमळा परिसरात बिबट्याने एका चिंकारालाही ठार केल्याचे समोर आले आहे. सलग दोन दिवसांत घडलेल्या या घटनांमुळे शेतकरी, शेतमजूर तसेच नागरिकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे.
पातरमळा येथील एका शेतामध्ये सोमवारी सकाळी पाणी धरत असताना शेताशेजारील झाडावर अर्धवट खाल्लेल्या अवस्थेत चिंकारा आढळून आला. हे दृश्य पाहून संबंधित कामगार घाबरून गेला. त्याने तातडीने ही माहिती माजी उपसरपंच समदास भुजबळ यांना दिली. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.यानंतर भालचंद्र भुजबळ यांनी वनविभागाला या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच वनमजूर हनुमंत पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या वेळी भालचंद्र भुजबळ, दादासाहेब मदने, सुधाकर पवार, किरण पवार आदी उपस्थित होते. प्राथमिक तपासणीत बिबट्यानेच चिंकाराचा फडशा पाडल्याचे स्पष्ट झाले असल्याचे सांगण्यात आले. ऊसशेती व दाट झाडी हा बिबट्याचा नैसर्गिक आश्रय असल्याने वाल्हे परिसरात त्याचा मुक्त संचार वाढल्याचे दिसून येत आहे. यामुळे पहाटे किंवा रात्रीच्या वेळी शेतात जाणे अथवा शेतमजुरी करणे धोक्याचे ठरत आहे. विशेषतः शाळकरी मुले, महिला व ज्येष्ठ नागरिक यांच्या सुरक्षेबाबत ग्रामस्थांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. बिबट्याच्या वाढत्या हालचालींमुळे ग्रामस्थांनी स्वसंरक्षणासाठी गटागटाने शेतात जाणे, रात्रीची कामे टाळणे अशी खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र ही तात्पुरती उपाययोजना असून कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी वनविभागाने ठोस पावले उचलावीत, बिबट्याच्या हालचालींवर तांत्रिक पद्धतीने नजर ठेवावी व नागरिकांचा विश्वास पुनःप्रस्थापित करावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांमधून जोर धरत आहे.