मुंबई, ता. २६ : जेएनपीटी बंदर, द्रोणागिरी उपनगर यांच्याबरोबर बेचक्यात असलेली पाणजे पाणथळ ही देश-विदेशातील पक्ष्यांसाठी नंदनवन! गुलाबी, धवल रंगांच्या फ्लेमिंगो अर्थात रोहित पक्ष्यांचा येथील सहज वावर ही तर पक्षिप्रेमींसाठी पर्वणीच! त्यामुळे या पाणथळीला अधिकृत पाणथळ क्षेत्राचा दर्जा दिल्याची घटना उरण-नवी मुंबईच्या पर्यावरण क्षेत्रासाठी खास ठरली. पर्यावरणवादी संघटनांच्या याचिकेवर सुनावणी करताना हरित लवादाने या जागेचा पाणथळ जागा म्हणून विकास करण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी अनेक वर्षे खर्ची घालणाऱ्या पर्यावरण संघटना आणि पर्यावरणवाद्यांनी समाधान व्यक्त केले.
नवी मुंबई विमानतळासाठी राखून ठेवलेल्या जागेपैकी १५१६ हेक्टर क्षेत्र हे पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असल्याचे सांगण्यात आल्यानंतर दि बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीकडून (बीएनएचएस) पाणजेचा काही भाग हा सीआरझेड अंतर्गत पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील म्हणून ठेवण्यास सांगितले. कारण पाणजे, फुंडे, बोकडवीरा आणि डोंगरी हा भाग पाणी साचण्याच्या नैसर्गिक जागा आहेत. यातील काही जागा सीआरझेडमध्ये समाविष्ट करण्यासाठी करार करण्यात आला होता. या भागात दरवर्षी दीड ते दोन लाख स्थलांतरित पक्षी येतात. त्यामुळे ही जागा पर्यावरणदृष्टीने संवेदनशील आहे, असे पाणजे प्रकरणातील याचिकाकर्ते नंदकुमार पवार यांनी सांगितले.
बीएनएचएसकडून पाणजेमध्ये सीआरझेड अंतर्गत पक्ष्यांसाठी ही जागा राखीव ठेवण्यासोबत पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील ठेवण्यास सांगण्यात आल्याने त्या ठिकाणी जाऊन पाहाणी केली असता पाणजे येथे भिंती आणि फ्लॅप गेट बसविण्यात आल्याचे समोर आले. या सर्व गोष्टी पाहून माहिती अधिकारात विनापरवानगी बांधण्यात आल्याचे समजले. त्यामुळे मच्छीमारांना अडचण होते. पक्ष्यांचा अधिवास व पाणथळ जागा नष्ट होत असल्याचे समोर आल्याने २०१८ मध्ये सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार पवार यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यानंतर पाणजे मुंबई उच्च न्यायालय नियुक्त राज्य पाणथळ तक्रार निवारण समितीने स्थलांतरित पक्ष्यांची जैवविविधतेने समृद्ध असूनही पाणथळीचा दर्जा देण्यास सांगितल्याने तिच्या संक्षणाच्या दृष्टीने आशेचा किरण निर्माण झाला आहे.
...….....
भरतीचे पाणी थांबविण्याचा अधिकार नाही
पाणजे पाणथळ ही नैसर्गिक पाणथळ जागा आहे. ती नष्ट करण्याचे प्रयत्न सुरूच राहिले. ११ नोव्हेंबर २०२० मध्ये पर्यावरण विभागाने रायगड जिल्हाधिकारी आणि सिडकोला ही पाणथळ पूर्वीसारखीच पुनर्जिवित करावी, असे निर्देश दिले. मात्र यानंतर कोणत्याही गोष्टींचे पालन झाले नाही. मात्र सिडकोने पाणथळीत पाणी येण्यासाठी हे ७० प्रवेशद्वार आणि कालवे हे पाणी बाहेर जाण्यासाठी असल्याचे सांगत पर्यावरण विभागाच्या विरोधात पुन्हा पुनर्विचार याचिका हरित लवादात दाखल केली. यात पावसाचे पाणी बाहेर जाण्यासाठी हे प्रवेशद्वार आहेत. ही जागा ‘सीआरझेड १’ मध्ये नाही हे ‘प्लॅप गेट’ नादुरुस्त राहिल्याने तेथे कांदळवन क्षेत्र तयार झाले आहे, असे त्यांनी याचिकेत सांगितले होते. मात्र भरतीचे पाणी थांबविण्याचा अधिकार नसल्याचे सांगत लवादाने सिडको आणि नवी मुंबई विशेष आर्थिक क्षेत्र यांचा दावा फेटाळून लावला.
.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.