पुणे, ता. ३० : ‘‘कौटुंबिक कलहातून विभक्त व्हावे लागलेल्या महिलांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन, त्यांच्यामध्ये आत्मसन्मान निर्माण करण्यासाठी ‘स्वयंसिद्धा’ उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यामुळे या महिलांना जगण्याची नवी उमेद मिळत आहे,’ असा विश्वास प्रमुख न्यायाधीश सुभाष काफरे यांनी व्यक्त केला.
येथील कौटुंबिक न्यायालयात न्यायप्रविष्ट प्रकरणांतील महिलांना विविध कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने ‘स्वयंसिद्धा’ हा उपक्रम राबविण्यात येतो. या उपक्रमांतर्गत ‘रोटरी क्लब ऑफ पुणे गांधीभवन’ आणि ‘आयसीआयसीआय अकादमी फॉर स्कील्स डेव्हलपमेंट’ यांच्या सहकार्याने महिलांना साबण, डिटर्जंट, मेणबत्ती तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. हा अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केलेल्या चौदा महिलांना कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश काफरे यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
‘स्वयंसिद्धा’ उपक्रमाच्या मार्गदर्शक न्यायाधीश मनीषा काळे, न्यायाधीश हितेश गणात्रा, न्यायाधीश निरंजन नाईकवाडे, न्यायाधीश राघवेंद्र आराध्ये, दि पुणे फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनच्या अध्यक्षा अॅड. वैशाली चांदणे, आयसीआयसीआय अकादमीच्या प्रमुख गुरप्रीत सभरवाल, रोटरी क्लब ऑफ पुणे गांधीभवनचे रोटरियन सुनील बर्वे यावेळी उपस्थित होते. ‘स्वयंसिद्धा’ अन्य महिलांसाठी रोल मॉडेल झाल्या असून, त्यांनी स्वबळावर जगण्याची लढाई जिंकली आहे,’ असे न्यायाधीश काळे म्हणाल्या. अॅड. वैशाली चांदणे, सुनील बर्वे आणि गुरप्रीत सभरवाल यांनीही मनोगत व्यक्त केले. कौटुंबिक न्यायालयातील समुपदेशक सुरेश सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले. समुपदेशक राणी दाते यांनी आभार मानले.
जगायचे बळ मिळाले :
पतीने माझ्याविरोधात घटस्फोटाचा दावा केल्याने मी नकारात्मक मानसिकतेत गेले होते. आयुष्यात काहीच उरले नसल्याची भावना निर्माण झाली होती. परंतु, ‘स्वयंसिद्धा’ उपक्रमामुळे मला जगायचे बळ मिळाले असून, स्वत:च्या क्षमतेची जाणीव झाली आहे, अशा भावना प्रशिक्षण घेतलेल्या महिलांनी व्यक्त केल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.