पुणे

मला नावं ठेवणारे गेले ‘खड्ड्यात’!

CD

‘‘याऽऽ याऽऽ, असे दचकू नका आणि बिचकू तर अजिबात नका आणि तुम्हाला गचका बसल्यावर उचकूही नका. मला पाहून तुमच्या पोटात ‘खड्डा’ का पडतोय? वास्तविक माझ्यामुळे अनेकांची पोटे भरतात, हे तुम्ही विसरू नका. वाटल्यास मला पाहून, तुमच्या गाडीचा वेग कमी करा पण पुढे गेल्यानंतर माझ्याकडे वळून रागाने पाहू नका. नाहीतर काही अंतरावरील आमच्या भावबंधाच्या जाळ्यात पुन्हा अडकाल.
काय म्हणता ? तुम्ही मला अजून ओळखलं नाही? पुण्यातील कोणत्याही रस्त्यावर जा, तिथे माझे अस्तित्व आहे. मला टाळून तुम्हाला पुढचा प्रवास करताच येणार नाही, इतका मी सर्वव्यापी आहे. खरं तर रस्ता तयार करतानाच, त्याला दृष्ट लागू नये म्हणून माझ्यासारख्या खड्ड्यांची निर्मिती केली असावी, असा माझा अंदाज आहे. मात्र, पुढे पुढे रस्त्याला दृष्ट लागण्याचे प्रमाण खूपच वाढले आणि त्याच प्रमाणात ठेकेदारही आम्हाला आरक्षण देत, आमची संख्या वाढवू लागले. पाऊस आणि रस्त्याचे काय नाते कोणास ठाऊक? पण केवळ भुरभूर पावसाला सुरवात झाली तरी आमचा जन्म होतो, एवढं निश्‍चित !
चंद्राची निर्मिती ही आम्हीच केली आहे, असा दावा पुणे महापालिकेने ‘नासा’कडे केल्याची बातमी तुम्हाला कळली का? त्यासाठी पुरावे म्हणून महापालिकेने चंद्रावरील खड्ड्यांचे फोटो ‘नासा’कडे पाठवले आहेत. आम्ही पुण्यातील रस्त्यावर असेच खड्डे तयार करतो, अगदी त्याच पद्धतीचे खड्डे आम्ही चंद्रावर तयार केले आहेत, असं त्यांचं म्हणणं आहे. पुण्यातील खड्ड्यांच्या प्रचंड यशामुळे लवकरच मंगळावर आणखी खड्डे पाडण्याचे काम महापालिकेला मिळण्याची शक्यता आहे, अशी कुजबूज महापालिकेत सुरू झाली आहे. त्यामुळे कंत्राटदारांच्या गोटात आनंद पसरल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. पुण्याची कीर्ती आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोचविण्यास मी कारणीभूत आहे, एवढंच मला यातून सांगायचंय.
सपाट आणि गुळगुळीत रस्त्यावरून प्रवास करण्यात कसली आलीय मजा? पुढं जायचं असेल तर खाचखळग्यांचा रस्ता असावा लागतो, तरच प्रगतीला वेग येतो, हे ठेकेदाराच्या लक्षात आल्याने त्याने आम्हाला जन्माला घातले आहे. ‘वाहने सावकाश चालवा’ असे अनेकदा आवाहन करूनही अनेक चालक भरधाव वेगाने गाड्या चालवून अपघाताला निमंत्रण देतात. त्यामुळे वाहनांचा वेग मर्यादित ठेवण्यासाठी आमची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, हे विसरू नका. आमच्यामुळेच अवघड बाळंतपणेही सुखरूप झाल्याच्या चर्चा तुमच्या कानावर आल्याच असतील ! सत्ताधारी मंडळींना माझा जसा आर्थिक आधार असतो, तसा विरोधकांनाही मी दरवर्षी काम पुरवतो. ‘खड्ड्यांत वृक्षारोपण,’ ‘सेल्फी वुईथ खड्डा,’ ही आंदोलने माझ्यामुळे सुरू झाली आहेत, याची जाणीव त्यांना आहे.
मी अनेकांचा तारणहार आहे, असं म्हटल्यावर कुत्सितपणे माझ्याकडं बघून हसू नका. मी खरं तेच सांगतोय. माझ्यामुळे अनेकांना रोजगार मिळतो, यावर विश्‍वास ठेवा. ठेकेदार तर मला देवच मानतो. ‘अशीच कृपा राहू द्या’ असं म्हणत तो मला हात जोडून नमस्कार करतो व दर पावसाळ्यात माझी खणा- नारळाने ओटी भरतो. मजूरवर्गाला माझ्याएवढा रोजगार कोणीच मिळवून देत नाही. सिमेंट, खडी, डांबर विक्रेते यांचे व्यवसाय माझ्यामुळे फायद्यात चालतात, हे उघड गुपित आहे. पुण्यातील हाडवैद्य व हाडांच्या डॉक्टरांची तर चंगळच असते. पुण्यातील ९५ टक्के रूग्ण मीच त्यांना पुरवत असतो. त्यामुळे ही मंडळी महापालिकेवर प्रचंड खूष असतात.
खड्ड्यांत गाडी आपटल्यामुळे मणक्यांचे जसे विकार होतात, तसेच गाड्यांचे टायर व इतर स्पेअर पार्टस हे लवकर खराब होतात. त्यामुळे टायरविक्रेते व स्पेअर पार्टस बनविणारे, त्यांचे विक्रेते व ते बसवणारे फिटर ही मंडळी मला दुवा दिल्याशिवाय राहत नाहीत. माझ्यामुळे त्यांचा व्यवसाय भरभराटीला आला आहे, हे ते खासगीत मान्य करतात. माझ्यामुळे पुण्याची अर्थव्यवस्था अशापद्धतीने सुरळीत सुरू आहे, याचा मला प्रचंड अभिमान आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tej Pratap Yadav : बिहार निवडणूक सुरू असतानाच केंद्र सरकारचा तेजप्रताप यादव बाबत मोठा निर्णय!

Kannad Election : उमेदवार शोधण्यासाठी राजकीय पक्षाची होतय दमछाक; कन्नडला अद्यापही युती, आघाडीसंदर्भात राजकीय पक्षांच्या हालचाली थंडच!

Bopodi Land Scam : बोपोडी जमीन व्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे; शीतल तेजवानीचे परदेशात पलायन?

Latest Marathi News Live Update : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

PMC Recruitment : पुणे महापालिकेतील कनिष्ठ अभियंता भरती प्रक्रिया निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT