सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. ४ ः पुणे-कोल्हापूर या महत्त्वाच्या महामार्गाचा प्रकल्प येत्या वर्षभरात पूर्ण करण्यात येईल, असे केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत आज सांगितले.
कोल्हापूर-पुणे रस्त्याच्या प्रकल्पाला विलंब झाला असून, तो कधी पूर्ण होईल, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या गटनेत्या सुप्रिया सुळे यांनी केला. पुणे ते सातारा या रस्त्याचे काम आधी रिलायन्सकडे होते. ते काढून आता दुसऱ्या कंत्राटदाराला दिले असून, त्यावर आम्ही नव्याने अध्ययन करीत आहोत. पुण्यातील वेस्टरली बायपासच्या सर्व्हिस लेनचे काम आम्ही आमच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून सुरु केले आहे. पुणे ते सातारा रस्त्याचे काम करण्यासाठी सहा हजार कोटींचा प्रकल्प अहवाल तयार केला आहे. साताऱ्यापासून कोल्हापूरपर्यंतच्या कामाचे कंत्राट बहाल करण्यात आले आहे. खंबाटकी घाटातील एक बोगदा लवकरच खुला करीत असल्याची माहिती गडकरी यांनी दिली.
मुंबई-गोवा महामार्गाचे काम एप्रिलपर्यंत पूर्ण
दीर्घकाळ रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे ८९ टक्के काम झाले असून, येत्या एप्रिलपर्यंत हा महामार्ग पूर्ण होईल, अशी माहिती गडकरी यांनी दिली. चांद्रयान मोहिमेवर जेवढा खर्च झाला नसेल, तेवढा खर्च गेल्या दहा वर्षांमध्ये होऊनही मुंबई-गोवा महामार्ग नीट झालेला नाही. याकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी लक्ष वेधले होते. यावर गडकरी म्हणाले, ‘‘या महामार्गाचे काम २००९ मध्ये सुरु झाले. त्यावेळी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्याकडे या रस्त्याचे काम देण्यात आले होते. मी २०१४ मध्ये मंत्री झालो. या रस्त्याच्या कामात भूसंपादनाचे प्रश्न होते. आतापर्यंत अनेक कंत्राटदार बदलले. अनेकदा कारवायाही झाल्या. या कामात प्रचंड विलंब झाला, यात शंका नाही.’’
वाहने थांबवून टोलवसुली समाप्त होणार
यापुढे टोल नाक्यावर वाहने थांबवून, टोल वसुलीची पद्धत समाप्त होणार असून, त्याऐवजी इलेक्ट्रॉनिक स्वरूपात टोल टॅक्सचे संकलन केले जाईल, असे गडकरी यांनी सांगितले.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आता टोल वसुली करण्यासाठी टोल नाकेच संपुष्टात आणणार आहे. टोल नाक्यावर प्रवेश केल्यावर वाहनाच्या नंबर प्लेटचा फोटो घेऊन, फास्ट ट्रॅकच्या साह्याने बँक खात्यातून पैसे वळते होतील, असे गडकरी यांनी समाजवादी पक्षाचे खासदार धर्मेंद्र यादव यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. यापुढे वाहने थांबवून टोल वसुली बंद होणार असून त्याऐवजी इलेक्ट्रॉनिक स्वरूपात टोल वसुली केली जाईल. त्यासाठी आम्ही सध्या दहा ठिकाणी कामांची कंत्राटे बहाल केली असून, वर्षभरात सर्वत्र या पद्धतीने टोल वसुली केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.