आंदोलनात सहभागाबद्दल खेद
प्रशांत भूषण ; मनमोहन सिंग यांची बदनामी झाल्याचा दावा
सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. २६ ः सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांनी, दिवंगत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची बदनामी करणाऱ्या देशव्यापी आंदोलनातील आपल्या सक्रिय सहभागाविषयी जाहीर खेद व्यक्त केला आहे. तसेच डॉ. सिंग यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त त्यांना श्रद्धांजलीही वाहिली आहे.‘‘‘डॉ. मनमोहन सिंग एक नम्र, सभ्य, सुशिक्षित आणि सद्भाव बाळगणारे व्यक्ती होते. पण त्यांची नम्रता आणि सभ्यताच त्यांची कमजोरी मानली गेली. त्यांची बदनामी करणाऱ्या आंदोलनात मी सहभागी झालो आणि त्यामुळे एका अप्रामाणिक राजवटीला सत्तेवर येण्यास मदत झाली, याचा मला खेद आहे,’’ अशी खंत प्रशांत भूषण यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये व्यक्त केली आहे. पंधरा वर्षांपूर्वी, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या देशव्यापी जनलोकपाल आंदोलनाला बळ देणाऱ्या ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ संस्थेमध्ये प्रशांत भूषण आणि त्यांचे दिवंगत पिता शशी भूषण यांची प्रमुख भूमिका होती. या आंदोलनामुळे केंद्रात सत्तांतर होण्यात हातभार लागला.
राहुल यांच्याकडूनही श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंग यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी २४, अकबर रोड स्थित काँग्रेस मुख्यालयात डॉ. मनमोहन सिंग यांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करून श्रद्धांजली वाहिली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस खासदार प्रियांका गांधी वद्रा आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी मनमोहन सिंग यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहिली. ‘‘मनमोहन सिंह यांनी आपल्या दूरदर्शी नेतृत्वाने भारताला आर्थिकदृष्ट्या सशक्त केले. देशातील वंचित आणि गरिबांसाठी त्यांच्या ऐतिहासिक प्रयत्न आणि धाडसी निर्णयांनी भारताची जागतिक व्यासपीठावर नवी ओळख प्रस्थापित केली. त्यांची विनम्रता, कर्मनिष्ठा आणि प्रामाणिकपणा आम्हा सर्वांसाठी सदैव प्रेरणादायी ठरेल,’’ असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.