लोणावळा, ता. २८ : पुणे महापालिकेच्या श्रीमती शां. बा. ढोले पाटील माध्यमिक विद्यालयातील ४० विद्यार्थ्यांनी लोणावळा परिसरातील खंडाळा येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रास शैक्षणिक भेट दिली. या दरम्यान विद्यार्थ्यांना पोलिस प्रशिक्षणाची प्रत्यक्ष व सविस्तर माहिती देण्यात आली.
प्रशिक्षण केंद्रात सुरू असलेल्या विविध कार्यपद्धती, प्रशिक्षणाचे टप्पे, पोलिस कर्मचाऱ्यांची निवास व्यवस्था, भोजन कक्ष, परेड मैदान तसेच विविध शस्त्रांविषयीची माहिती विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष पाहून समजून घेतली. तसेच पोलिस प्रशिक्षण केंद्राची स्थापना, कार्यपद्धती व जबाबदाऱ्या याविषयीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. शिस्तबद्ध वातावरण, परेड व प्रशिक्षण प्रक्रिया पाहून विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता व कुतूहल निर्माण झाले. पोलिस दलाच्या कार्यपद्धतीची प्रत्यक्ष ओळख झाल्याने अनेक विद्यार्थ्यांना पोलिस सेवेकडे आकर्षण निर्माण झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली.
या भेटीसाठी पोलिस प्रशिक्षण केंद्र, खंडाळा येथील प्राचार्य स्मार्तना पाटील व पोलिस निरीक्षक रणजीत यमगर यांनी विशेष परवानगी दिली. केंद्रभेटीदरम्यान उपप्राचार्य श्रीहरी पाटील, महेश रासकर यांनी प्रशिक्षण केंद्रातील विविध घटकांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. ही सहल विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक व प्रेरणादायी ठरली. या शैक्षणिक सहलीसाठी मुख्याध्यापिका सीमा गिरी, शिक्षक नितीन खाकाळ, रत्नप्रभा मुदगुन, किशोरी आव्हाळे आदींनी संयोजन केले.