महाबळेश्वरच्या घाटात माणुसकीचे दर्शन
धावत्या बसमधील प्रसूती संकट परतावले; डॉक्टर दांपत्याने वाचवले दोन जीव
महाबळेश्वर, ता. २७ : पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी घराबाहेर पडलेला एक कुटुंब... निसर्गरम्य महाबळेश्वरच्या घाटातील वळणदार रस्ते आणि अचानक सुरू झालेला प्रसूतीच्या वेदना. रोहा येथून महाबळेश्वरकडे येणाऱ्या एका मिनीबसमध्ये हा थरार घडला. दरम्यान, कुंभरोशीच्या डॉक्टर दांपत्याने आपल्या कौशल्याची पराकाष्ठा करत दोन जिवाने वाचवले.
नेत्रा राहुल चव्हाण ही महिला आपल्या कुटुंबासह एका मिनीबसमधून महाबळेश्वरच्या दिशेने येत होत्या. मात्र, कुंभरोशी गावाजवळ पोहोचताच नियतीने त्यांची परीक्षा घेण्यास सुरुवात केली. नेत्रा यांना अचानक तीव्र प्रसूती वेदना सुरू झाल्या. निर्जन रस्ता, हाताशी नसलेली वैद्यकीय मदत आणि धावत्या बसमधील असह्य कळांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून बसचालकाने प्रसंगावधान राखत वाहन कुंभरोशी येथे थांबवले. नेमक्या याच वेळी डॉ. महेंद्र भिलारे यांच्या रूपाने आशेचा किरण दिसला. प्राथमिक तपासणीतच वेळ फार कमी असल्याचे डॉ. महेंद्र भिलारे आणि डॉ. प्रीतिशा भिलारे या दांपत्याच्या लक्षात आले. रुग्णवाहिकेची वाट पाहण्याइतपत वेळ हातात नव्हता. कोणत्याही अत्याधुनिक उपकरणांची किंवा मोठ्या हॉस्पिटलची सोय नसताना, एका बाजूला माणुसकीचे नाते आणि दुसऱ्या बाजूला डॉक्टर म्हणून असलेले कर्तव्य अशा दुहेरी भूमिकेतून त्यांनी प्रसूती करण्याचा धाडसी निर्णय घेतला. काही क्षणांच्या तणावानंतर, त्या चिमुकल्या क्लिनिकमध्ये एका नवजात अर्भकाचा रडण्याचा आवाज गुंजला आणि उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू फुटले.
या कठीण प्रसंगात केवळ डॉक्टरच नव्हे, तर कुंभरोशी गावातील ग्रामस्थही मदतीला धावून आले. संकट काळात जात-पात, ओळख विसरून संपूर्ण गाव या अनोळखी पर्यटकाच्या मदतीसाठी उभा राहिला. सध्या आई आणि बाळ दोघेही महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात सुखरूप असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. पर्यटनासाठी निघालेला हा प्रवास कदाचित निसर्गाच्या सहवासासाठी होता; पण तो एका नव्या आयुष्याच्या आगमनाचा आणि माणुसकीच्या दर्शनाचा साक्षीदार ठरला.
-----------------------------
फोटो
डॉ. महेंद्र भिलारे - 04870
डॉ. प्रीतिशा भिलारे - 04871
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.