पुणे, ता. २ : महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जडणघडण करणारे अनेक श्रेष्ठ संत या भूमीत होऊन गेले. आषाढी एकादशीनिमित्त याच संतांचे अलौकिक कार्य जाणून घेण्याची आणि त्यांच्या विचारांची शिदोरी अनुभवण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. निमित्त आहे, संतचरित्र कीर्तन महोत्सवाचे.
‘सकाळ माध्यम समूह’ आणि भक्ती-शक्ती व्यासपीठातर्फे शुक्रवारी (ता. ४) दुपारी चार वाजेपासून स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे एकदिवसीय संतचरित्र कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पांडुरंगाच्या दर्शनाची आस प्रत्येकाला असली, तरी सर्वांनाच आषाढी वारी शक्य होत नाही. अशा भाविकांना हरिनामाचा महिमा अनुभवता यावा आणि संतविचारांची शिदोरी त्यांना मिळावी, म्हणून या महोत्सवाचे आयोजन केले आहे. ‘सोनी मराठी’ वाहिनीवर सध्या सुरू असलेल्या ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ या कार्यक्रमाच्या महाअंतिम फेरीत पोहोचलेले अव्वल पाच कीर्तनकार या महोत्सवात सहभागी होणार आहेत.
यात हर्षद महाराज भागवत, सोमनाथ महाराज पाटील, प्रमोद महाराज डुकरे, लक्ष्मण महाराज लटपटे आणि कल्याणी महाराज मोरे या पाच कीर्तनकारांचा समावेश आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत कान्होपात्रा आणि संत कान्होबा या पाच संतांची चरित्र हे पाचही कीर्तनकार उलगडणार असून प्रत्येक संताचा एक अभंग ते सादर करणार आहेत.
‘सर्किट हाऊस क्रिएशन्स’ यांच्या विशेष सहकार्यातून हा महोत्सव सादर होत आहे. ‘कोहिनूर ग्रुप- अ कृष्णकुमार गोयल एंटरप्राईज’, ‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि.’ आणि ‘हिंदमाता प्रतिष्ठान महिला समूह संघटक’ हे या महोत्सवाचे सहयोगी प्रायोजक आहेत.
विनामूल्य प्रवेश, मात्र प्रवेशिका आवश्यक
या कीर्तन महोत्सवासाठी विनामूल्य प्रवेश असून, प्रवेशिका मात्र आवश्यक आहे. या प्रवेशिका मंगळवारपासून (ता. १) बुधवार पेठेतील सकाळ कार्यालयात, तसेच ‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी लि.’च्या सेनापती बापट रस्ता व नवी पेठ शाखेत सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत आणि बालगंधर्व रंगमंदिर व यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सकाळी ९ ते ११.३० व सायंकाळी ५ ते ८ वाजेपर्यंत उपलब्ध आहेत.
संतचरित्र कीर्तन महोत्सव :
कधी : शुक्रवार (ता. ४)
केव्हा : सायंकाळी ४ वाजेपासून
कुठे : गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.