पुणे, ता. १५ : सातारा येथे होणाऱ्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील यांचा मंगळवारी (ता. १६) अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे जाहीर सत्कार होणार आहे. मंगळवारी सायंकाळी सहा वाजता टिळक रस्त्यावरील परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.
महामंडळाचे अध्यक्ष आणि परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी ही माहिती दिली. महाराष्ट्र परिषदेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते विश्वास पाटील यांचा सत्कार करण्यात येणार आहे. माजी संमेलनाध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक-समीक्षक डॉ. श्रीपाल सबनीस या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पाटील यांचा हा पहिलाच जाहीर सत्कार आहे. परंपरेप्रमाणे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांचा पहिला सत्कार महाराष्ट्रातील आद्य साहित्य संस्था असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे करण्यात येतो. यानिमित्ताने अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पाटील पहिल्यांदाच पुण्यात येत आहेत. दिवसभरात ते काही प्रकाशन संस्थांनाही सदिच्छा भेट देणार आहेत.