पुणे, ता. ४ : मंडळातील छोट्या कार्यकर्त्यांनी साकारलेले जिवंत देखावे, गुहेत अष्टविनायकाचे दर्शन, काल्पनिक देखावे, आकर्षक अशी विद्युत रोषणाई यासह अनेक पौराणिक देखावे भांडारकर रस्ता, गोखले रस्ता, नामदार गोपाळ कृष्ण गोखले पथ (फर्ग्यूसन महाविद्यालय रस्ता), जनवाडी, पांडवनगर, विधी विद्यालय रस्ता परिसरात साकारण्यात आले आहेत. त्यास गणेश भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून संध्याकाळच्या वेळी देखावे पाहण्यासाठी गर्दी होत आहे.
अखिल शिवाजीनगर पोलिस लाईन मित्र मंडळाचे यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. मंडळाने भव्य असा महालक्ष्मी मंदिराचा देखावा सादर केला आहे. गोलंदाज चौकात असलेल्या अमर मित्रमंडळाने आकर्षक विद्युत रोषणार्इचा देखावा तयार केला आहे. जय भवानी मित्रमंडळाने १२ ज्योतिर्लिंगाचा देखावा साकारला आहे. न्यू जन मित्रमंडळ ट्रस्टने ‘गुहेत अष्टविनायकाचे दर्शन’ हा देखावा सादर केला आहे. छोटीशी गुहा तयार करून त्यात अष्टविनायकांच्या मूर्ती स्थापन करत आकर्षक सजावटदेखील केली आहे. रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करत असलेल्या अखिल सेनापती बापट रोड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा सुवर्ण मंदिर उभे केले आहे.
विधी महाविद्यालया रस्त्यावर असलेल्या अखिल लॉ कॉलेज रोड मित्रमंडळाने काल्पनिक अशी शंकराची पिंड तयार केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला यंदा १०० वर्षे पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने गोखले स्मारक चौक मित्रमंडळ ट्रस्टने संघावर आधारित असलेला एक लघुपट तयार केला असून त्याचे सादरीकरण करण्यात येत आहे. सुदर्शन मित्रमंडळ संस्थेने यंदा ‘बगीचा महाल’ तयार केला आहे. संत ज्ञानेश्वर महाराज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने राम-लक्ष्मण, सीता आणि गरुड हनुमानाचा देखावा तयार केला आहे.
पुन्हा हवे छत्रपती शासन
महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटना, सातत्याने होत असलेले गैरप्रकार यावर प्रकाश टाकत असे गुन्हे कोणी केल्यास त्याला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात ज्याप्रमाणे शासन दिले जात होते, तसा जिवंत देखावा संत तुकाराम महाराज मंडळाने सादर केला आहे. सध्या समाजात घडत असलेल्या अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी पुन्हा छत्रपती शासन हवे असे देखाव्यातून मांडण्यात आले आहे. महिलांवरील अन्याय रोखण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यांची चांगल्या प्रकारे अंमलबजावणी होणे आवश्यक आहे, असे देखील त्यात नमूद केले आहे.
छोट्या कार्यकर्त्यांचा ‘छावा’
वडराज तरुण मित्रमंडळाच्या छोट्या कार्यकर्त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित असलेल्या ‘छावा’ चित्रपटातील विविध प्रसंग दाखविणारा जिवंत देखावा सादर केला आहे. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सर्व नियोजन करून तयार हे २३ मिनिटांचे सादरीकरण तयार केले आहे. मंडळातर्फे दरवर्षी विविध सामाजिक विषयांवर जिवंत देखावे सादर केले जातात.
इंग्रजीला पायघड्या कशासाठी?
गोखलेनगर भागातील सुयोग मित्रमंडळाने ‘इंग्रजी माध्यमाला पायघड्या कशासाठी?’ हा संशोधनातून देखावा सादर केला असून, अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग असल्याचा दावा करण्यात आला आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर, भारतरत्न सचिन तेंडुलकर, राष्ट्रपती प्रतिभा पाटील, समाजसेवक बाबा आमटे, लष्करप्रमुख मनोज नरवणे, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई यांनी मातृभाषेतून शिक्षण घेऊन जागतिक कीर्ती मिळविली. मराठी भाषेला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. तरीही गेल्या दोन वर्षांत सुमारे ५०० मराठी शाळांना कुलूप लावण्याची वेळ आली आणि इंग्रजी माध्यमात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या तीन लाखाने वाढली याकडे देखाव्यातून लक्ष वेधले गेले आहे. मंडळ यंदा ५१ वे वर्ष साजरे करत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.