पुणे, ता. ९ : जयमाला शिलेदार यांच्या जन्मशताब्दीनिमित्त अश्विनी स्वरालयातर्फे रविवारी (ता. १४ ) नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात सकाळी नऊ ते सायंकाळी साडेसात या वेळेत दिवसभराचा ‘नाट्य स्वर यज्ञ’ आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात तब्बल २२ संगीत नाटकांतील १०१ नाट्यगीते सादर होणार आहेत, अशी माहिती संचालिका अश्विनी गोखले यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
सौभद्र, मानापमान, संशयकल्लोळ, स्वयंवर, सुवर्णतुला, एकच प्याला, शाकुंतल, कान्होपात्रा यांसारख्या नाटकांतील लोकप्रिय पदांबरोबरच अमृत सिद्धी, द्रौपदी, सावित्री, देवमाणूस, अवघी दुमदुमली पंढरी, कालिदास या नाटकांचे सादरीकरण तसेच संगीत नाटकांमधील ‘वद जाऊ कोणाला’, ‘खरा तो प्रेमा’, ‘नरवर कृष्णासमान’ आदींचे सादरीकरण होईल. एका दिवसात १०० पेक्षा अधिक नाट्यगीते सादर होणार असल्याने या कार्यक्रमाची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
या कार्यक्रमात स्वरालयातील ६५ विद्यार्थी तसेच निनाद जाधव, धनश्री खरवंडीकर, चिन्मय जोगळेकर आदी कलाकार सहभागी होणार आहेत. संजय गोगटे, विद्यानंद देशपांडे, केदार परांजपे आदींची साथसंगत लाभणार असून, वर्षा जोगळेकर व अनुपमा कुलकर्णी कार्यक्रमाचे निवेदन करणार आहेत.