पुणे, ता. ९ : माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोमकरच्या खुनाच्या गुन्ह्यात गुन्हे शाखेने सूर्यकांत ऊर्फ बंडू राणोजी आंदेकर याच्यासह सहा जणांना अटक केली. आतापर्यंत आठ जणांना अटक केली असून, पाच जण फरार आहेत. गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त पंकज देशमुख आणि पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी मंगळवारी (ता. ९) पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
सूर्यकांत ऊर्फ बंडू राणोजी आंदेकर (वय ६८), स्वराज निलंजय वाडेकर (वय २२), वृंदावनी निलंजय वाडेकर (वय ४०), तुषार निलंजय वाडेकर (वय २६) या चौघांना बुलडाणा जिल्ह्यातून अटक केली, तर अमन युसूफ पठाण ऊर्फ खान आणि सुजल राहुल मेरगू (वय २३, सर्व जण रा. नाना पेठ) या दोघांना पुण्यातून अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या खून प्रकरणात १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी अभिषेक उदयकांत आंदेकर (वय २१), कृष्णा ऊर्फ कृष्णराज सूर्यकांत आंदेकर (वय ४०), लक्ष्मी उदयकांत आंदेकर (वय ६०), शिवराज उदयकांत आंदेकर (वय २९), शिवम ऊर्फ शुभम उदयकांत आंदेकर (वय ३१, सर्व जण रा. नाना पेठ) हे पाच आरोपी अद्याप फरार आहेत. अमित प्रकाश पाटोळे (वय १९, रा. नाना पेठ) आणि यश सिद्धेश्वर पाटील (रा. नाना पेठ) या दोघांना यापूर्वी अटक केली असून, त्यांना १२ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
आरोपींनी आयुषवर शनिवारी (ता. ५) सायंकाळी नाना पेठेत ११ गोळ्या झाडून निर्घृणपणे खून केला. आयुष हा त्याच्या लहान भावाला कोचिंग क्लासवरून आणण्यासाठी गेला असताना हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला. हा प्रकार लहान भावासमोरच घडला. आयुष हा बंडू आंदेकरचा नातू असून एमआयटीमध्ये अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता. यश पाटील आणि अमन पठाण या दोघांनी आयुषवर गोळीबार केला, तर अमित पाटोळे आणि सुजल मेरगू हे दुचाकीवर बसून होते. गोळीबारानंतर चौघे जण दुचाकीवरून पसार झाले.
वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी सोमनाथ गायकवाडच्या आंबेगाव पठार येथील कुटुंबीयांना आंदेकर टोळीने लक्ष्य केले होते. मात्र, पोलिसांनी तो कट वेळीच उधळल्यानंतर आरोपींनी गणेश कोमकरचा मुलगा आयुषचा खून केला. आंबेगाव पठार येथील प्रयत्न फसल्यावर बंडू आंदेकर परराज्यात पळाला होता. तो कोची येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर तो बुलडाणा जिल्ह्यात मेहकर परिसरातील महामार्गावर साथीदारांसह असल्याचे समजले. पथकाने पहाटेच त्याला ताब्यात घेऊन पुण्यात आणले. आरोपींकडे सखोल चौकशी सुरू असून, आणखी धागेदोरे समोर येतील.
- पंकज देशमुख, अतिरिक्त पोलिस आयुक्त