पुणे, ता. ९ : गीताधर्म मंडळाच्या शताब्दी वर्षानिमित्त देण्यात येणारा ‘गीताधर्मव्रती विशेष पुरस्कार’ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जाहीर झाला आहे. याप्रसंगी प्रसिद्ध प्रवचनकार मोहना चितळे यांना ‘ताई आपटे पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती गीताधर्म मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. मुकुंद दातार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. हा पुरस्कार प्रदान कार्यक्रम रविवारी (ता. १४ ) दुपारी १ वाजता जंगली महाराज रस्त्यावरील बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहे.
दातार पुढे म्हणाले, ‘‘गीताधर्म म्हणजे कर्मयोग म्हणजेच स्वतःचा स्वार्थ न ठेवून केलेले कर्तव्य आहे. भारतामध्ये केवळ दोनच संस्था आहेत ज्या फक्त ‘गीता’ या विषयावर काम करतात. त्यात गीताधर्म मंडळाचा समावेश आहे. यासोबतच मंडळातर्फे विविध सामाजिक उपक्रम, भगवत गीतेचा प्रसार आदी कार्यक्रम वर्षभर घेण्यात येतात. जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी मंडळाच्या विनया मेहेंदळे, शैलजा कात्रे, प्रीती गंगाखेडकर, अॅड. आनंद आकुत, गीतेश जोशी आदी उपस्थित होते.