अटक आरोपींना मंगळवारी संध्याकाळी येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते. आरोपींनी फौजदारी पात्र कट केला असून त्यांनी पिस्तुलाने गोळीबार करून खुनासारखा गंभीर गुन्हा केला आहे. आरोपी अमान पठाण याने यापूर्वीदेखील एका गुन्ह्यात पिस्तूल पुरविले आहे. काही आरोपींनी आंबेगाव पठार येथील आंदेकर टोळीचे प्रतिस्पर्धी सोमनाथ गायकवाड व त्यांचे टोळीतील सहआरोपी यांच्या घराची रेकी केली. आरोपींचा गुन्हा करण्याचा उद्देश काय होता, याबाबत तपास करायचा आहे. अटक आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यामुळे या गुन्ह्याच्या सखोल तपासासाठी आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील नीलिमा इथापे-यादव यांनी केला. तपास अधिकारी पोलिस निरीक्षक (गुन्हे) चेतन मोरे यांनी गुन्ह्याच्या तपासाबाबतची माहिती न्यायालयास दिली. आरोपींच्या वतीने ॲड. मिथुन चव्हाण, ॲड. मनोज माने आणि ॲड. प्रशांत पवार यांनी बाजू मांडली. खून झालेला मुलगा बंडू आंदेकर यांचा नातू आहे. वनराज आंदेकर यांच्या खून प्रकरणात या गुन्ह्यातील फिर्यादीचे कुटुंबीय हे आरोपी आहेत. त्यामुळे या गुन्ह्यात आंदेकर आणि वाडेकर कुटुंबीयांना आरोपी करण्यात आले आहे. आंबेगाव पठार येथील रेकी प्रकरणात आमचे नाव नाही. या गुन्ह्यात काही जप्त करायचे बाकी नाही. त्यामुळे आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात यावी, असा बचाव ॲड. चव्हाण, ॲड. माने आणि ॲड. पवार यांनी केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. आर. बडवे यांनी आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
पोलिस घेताहेत पाच आरोपींचा शोध
या गुन्ह्यात यापूर्वी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना १२ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यात एकूण १३ आरोपी असून, त्यातील आठ जणांना अटक करण्यात आली आहे, तर इतर आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.
गुन्ह्याशी माझा संबंध नाही ः बंडू आंदेकर
न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने बंडू आंदेकर यांनी पोलिसांच्या विरोधात काही तक्रार आहे का? असे विचारले. तेव्हा त्यांनी सांगितले की, हा सर्व प्रकार घडला तेव्हा मी केरळला होतो. चौकशीसाठी बोलावत मला अटक करण्यात आली. मला या गुन्ह्यात गोवण्यात आले असून, यात माझा काहीही संबंध नाही.