पुणे, ता. ९ : स्नेहदीप जनकल्याण फाउंडेशन आणि महाराष्ट्र पर्यटन मंडळातर्फे विशेष उपक्रमांतर्गत ४०० ज्येष्ठ नागरिकांना शहरातील पाच मानाच्या गणपतींचे दर्शन घडविण्यात आले, अशी माहिती स्नेहदीप संस्थेचे अध्यक्ष प्रकाश भंडारी यांनी दिली.
गणेशोत्सव काळातील प्रचंड गर्दीमुळे अनेक वयोवृद्धांना दर्शन घेणे शक्य होत नसल्याने हा उपक्रम राबविण्यात आला. पोलिस, मानाच्या गणपती मंडळांचे कार्यकर्ते आणि संस्थेच्या स्वयंसेवकांच्या मदतीने दर्शन व्यवस्था करण्यात आली. ज्येष्ठ नागरिकांसाठी वातानुकूलित बस, नाश्ता, फूड पॅकेट, पाणी आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. घराजवळून त्यांना घेऊन जाण्याचीही व्यवस्था होती. ‘‘या वयात एवढ्या सोयी सुविधांसह मानाच्या गणपतींचे दर्शन घेता आले, हे आमच्यासाठी अविस्मरणीय आहे,’’ अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.